जळगाव 12 डिसेंबर : बाहुबली चित्रपटात ज्याप्रमाणे महादेवाची पिंड नायक मूळ जागेवरून खोदून काढतो आणि वाहत्या पाण्याच्या धबधब्या खाली ठेवतो, असाच काहीसा प्रकार यावल तालुक्यातील साकळी गावात उघडकीस आला आहे. गावातील पाटचारीजवळील श्री पाटेश्वर महादेव मंदिरात हा प्रकार घडला. यात श्री महादेवांच्या पिंडीची तोडफोड करून ती खोदून कोणीतरी अज्ञात माथेफिरूनी पिंड थेट जवळच्या पाटचारीच्या पाण्यात टाकली. सदर प्रकार निर्दशनास येताच पोलिसांना माहिती देण्यात आली आणि घटनास्थळी पोलिसांचं पथक दाखल झालं. पोलिसांनी पंचनामा करून पिंड ताब्यात घेतली आहे. तर या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभास या दाक्षिणात्य अभिनेत्याचा चित्रपट बाहुबली खूपच लोकप्रिय झाला होता. यातील एका दृश्यात आई महादेवाच्या पिंडीवर खूप परिश्रम घेऊन पाणी टाकत आहे, हे पाहून नायक थेट महादेवाची पिंड खोदून खांद्यावर उचलतो आणि पाण्याच्या धबधब्याखाली ठेवतो, हे दृश्य लोकप्रिय ठरलं होतं. अशीच काहीशी घटना साकळी यावल येथे उघडकीस आली आहे. Bharat Gaurav Yatra : पंढरपूर आणि शिर्डीचं घ्या एकत्र दर्शन, खास रेल्वेचा होणार सोलापूरकरांना फायदा साकळी जवळील पिळोदा रस्त्यालगत असलेल्या हतनूर पाटचारी जवळ श्री पाटेश्वर महादेवाचं मंदिर आहे. या मंदिरात भव्य अशी वजनदार महादेवाची पिंड एका काँक्रीट ओट्यावर स्थापित होती. या देवस्थानाचे बांधकाम लोकवर्गणीतून सुरू आहे आणि एक प्रशस्त असे भाविक, भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून हे देवस्थान साकळीसह पंचक्रोशीत परिचित आहे. दरम्यान रविवारी येथे सकाळी जेव्हा भाविक भक्त दर्शनासाठी आले तेव्हा मंदिरातील महादेवाची पिंड जागेवर नसल्याचं दिसून आलं. तेव्हा त्यांनी सर्वत्र शोधा-शोध केली असता सदरील मंदिरातून खोदून महादेवाची पिंड ही थेट जवळच असलेल्या हतनूरच्या पाटाच्या चारीत पाण्यात बुडालेली दिसून आली.
जळगावात ‘बाहुबली’ प्रकार; यावल तालुक्यातील साकळी गावात माथेफिरूने मंदिरातील पिंड उचलून पाण्यात नेऊन ठेवली, संतापलेल्या गावकऱ्यांची पोलिसांत धाव pic.twitter.com/SF3e07WJ4S
— News18Lokmat (@News18lokmat) December 12, 2022
याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली आणि घटनास्थळी पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, हवालदार सिंकदर तडवी, युनूस तडवी, बालक बाऱ्हे, रोहिल गणेश आदी दाखल झाले. पोलिसांनी पंचानामा करून महादेवाची पिंड ताब्यात घेतली. या घटनेमुळे गावातील लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे, अशा प्रकारचं कृत्य करून धार्मिक भावना भडकवणाऱ्याविरूध्द कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी यावल पोलिसांत अशोक शंकर भिल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सिंकदर तडवी करीत आहेत. भावी ‘अग्निवीर’ स्टेरॉईडच्या विळख्यात! कोल्हापुरातील धक्कादायक घटना मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी - श्री महादेवांच्या पिंडाची तोडफोड केल्याची माहिती मिळताच मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक, भक्तांनी गर्दी केली होती. श्री पाटेश्वर महादेव मंदिर हे जागृत देवस्थान असल्याने या मंदिरात दररोज अनेक भाविक- भक्त येऊन दर्शन घेतात. तर श्रावण महिन्यात देवाचे मनोभावे विधी होत असतात. श्री महादेवाची पिंड खोदून काढणाऱ्यांचा निषेध करीत महादेवाच्या पिंडीची स्थापित मूर्ती हलवून तिची विटंबना करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदींकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.