ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी
कोल्हापूर, 11 डिसेंबर : अग्निवीर भरती प्रक्रियेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमेदवार अग्निवीर स्टेरॉईडच्या विळख्यात असल्याचं समोर आलं आहे. भरती प्रक्रियेत तात्पुरती उर्जा वाढवण्यासाठी स्टेरॉईडचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोल्हापुरात गेल्या महिनाभरापासून अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया सुरू आहे, मात्र या भरतीसाठी तरुण उत्तेजक द्रव्य घेत तात्पुरती उर्जा मिळवण्यासाठी चक्क स्टेरॉईडचा वापर करत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
भरती सुरू असलेल्या ठिकाणी स्वच्छतागृहांमध्ये स्टेरॉईड्सच्या इंजक्शनचा खच पडलेला आढळून आला. दोनच दिवसांपूर्वी स्टेरॉईड्सच्या ओव्हरडोसमुळे एक तरुण बेशुद्ध पडल्याने तिथल्या यंत्रणेचीदेखील चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे हे इंजक्शन तरुणांजवळ कुठून येतायत, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सैन्य दलातील भरती प्रक्रियेदरम्यान धावण्याच्या चाचणीत तरुणांसमोर प्रचंड स्पर्धा असते, त्यामुळे धावण्याची क्षमता वाढवण्यासाठी तरुणांकडून चक्क स्टेरॉईडचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सैन्य भरती असो किंवा पोलीस भरती, या भरतीसाठी अशाप्रकारचे इंजक्शन वापरायला मनाई आहे, मात्र स्टेरॉईडमुळे तरुणांमध्ये तात्पुरती उर्जा वाढते, परिणामी स्पर्धेत त्यांची धावण्याची गतीही वाढते, त्यामुळे तरुण सर्रास या इंजक्शनचा वापर करत आहेत. डॉक्टरांच्या मते जास्त स्टेरॉईड्स घेणं धोकादायक आहे, त्यामुळे अनेक विकार जडू शकतात. कृत्रिम उर्जेचा आधार घेऊन सैन्य भरतीचं स्वप्न पाहणारे हे तरुण पुढे देशाच्या सीमेवर कसा लढा देणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.