मुजीब शेख, नांदेड 21 जून : खराब रस्त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अनेकदा अपघात होऊन नागरिकांना प्राण गमवावे लागतात. मात्र, आता नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यातील शेल्लाळी फाटा येथून एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. यात धावत्या बसच्या दाराचं हूक तुटून दरवाजा उघडला गेला. यानंतर या घटनेत एका प्रवाशाचा खाली पडून मृत्यू झाला आहे. लक्ष्मण गायकवाड असं मृताचं नाव आहे. मुखेड आगाराची बस कंधारहून मुखेडकडे प्रवासी घेऊन जात होती. दरम्यान आंबुलागा गावाच्या पुढे ते सावरगावपर्यंत रस्त्याचं काम रखडलं आहे. त्यामुळे रस्ता अतिशय खराब आहे. तो रस्ता सुरू झाला की चढ आणि घाट वळण रस्त्यांवर शेल्लाळी पाटीच्या जवळ धावत्या एसटीचा दरवाजा उघडला. Bus accident : छ. संभाजीनगरात एसटी बसचा भीषण अपघात; 25 प्रवासी जखमी बसचा दरवाजा उघडताच दारालगत उभे असलेले गायकवाड धावत्या बसमधून खाली पडले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण गायकवाड हे अंबुलगा येथे आपल्या साडूभाऊला भेटून परत सावरगाव येथे सासरवाडीला जात होते. बसमध्ये प्रवाश्यांची गर्दी होती. बसायला जागा नसल्याने ते बसच्या दरवाजासमोर थांबले होते. मात्र काही वेळाने अचानक बसच्या दरवाजाचा हुक तुटला आणि दरवाजा उघडला. या घटनेत गायकवाड बसमधून खाली कोसळले. यानंतर बसचं पाठीमागील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.