डोंबिवली, 09 नोव्हेंबर : राज्यातील पहिला महारेरा सर्टीफिकेट घोटाळ्याची लिंक आता राजकीय नेत्यांपर्यंत पोहचू लागली आहे. कारण इतका मोठा घोटाळा हा राजकीय आशीर्वाद शिवाय होणे शक्यच नाही अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे. 65 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर यांत 5 जणांना अटक झाली. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार असं मत आता तपास यंत्रणांचे झाले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत उघडकीस आलेला महारेरा सर्टिफिकेट घोटाळा आता चांगलाच चर्चेत आला आहे.
जेव्हापासून ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणात लक्ष घातलंय तेव्हापासून या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या SIT ने तपास वेगाने करत ५ जणांना अटक देखील केली. पण SIT इतके दिवस काय करत होती असा देखील प्रश्न उपस्थित होतो. कारण SIT वर राजकीय दबाव आहे का? असा संशय अनेकांनी व्यक्त केला होता. तोच आता या प्रकरणात राजकीय लिंक समोर आल्याने विविध चर्चांना उधाण आलंय.
महा रेरा बनावट सर्टिफिकेट घोटाळ्याकडे सुरुवातीपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते. कारण ज्या ६५ बांधकाम व्यावसायिंकानी हे बनावट रेरा सर्टिफिकेट मिळवले आहे, त्यांच्या प्रोजेक्टमध्ये अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी काळा पैसा गुंतवला. यातील काही पैसा हा परदेशातून आल्याचे देखील बोलले जात आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मनी लॅाड्रिंग झालंय म्हणून ईडीने या प्रकरणात एंट्री केली.
('ठाकरेंचे आमदार रात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि...'; खासदाराचा गौप्यस्फोट)
कल्याण डोंबिवलीत NA घोटाळा झाला होता. त्यावेळेस जवळपास अडीचशे पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिकांची पळता भूई थोडी झाली होती. आपल्यावर पोलीस कारवाई होवू नये म्हणून लाखो रुपये घेवून बांधकाम व्यावसायिक राजकीय नेत्यांकडे चकरा मारत होते. तेव्हा NA घोटाळ्यात राजकीय नेत्यांनी मांडवली बादशाहची भूमिका बजावली होती. आता मात्र महा रेरा घोटाळ्यात राजकीय नेत्यांचाच वरदहस्त असल्याने प्रकरण रफा दफा करण्याकरता जोर लावला जातोय.
('महाराष्ट्रावर हैवानांचं राज्य, सिल्लोडचा बेडूक...'; ठाकरे गटाची सत्तारांवर टीका)
महा रेरा बनावट सर्टिफिकेट प्रकरणात अटक केलेल्या ५ जणांच्या चौकशीत देखील धक्कादायक माहिती समोर आली. यामुळे सध्या दिसत असलेला महा रेरा सर्टिफिकेट घोटाळा हिमनगाचे टोक असून या टोळीने राज्यात इतरही ठिकाणी असाच घोटाळा केलाय का? याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.