मुंबई 05 जून : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (2nd Wave of Coronavirus) राज्यात अक्षरशः थैमान घातलं होतं. अशात आता हा लाट काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे. त्यामुळे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अनलॉक (Maharashtra Unlock) संदर्भात घोषणा केली होती. मात्र, काही तासातच राज्य सरकारनं खुलासा करून कोणतीही नियमावली अद्याप निश्चित करण्यात आलेली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, अखेर शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जारी करण्यात आली आहे. राज्यात अनलॉकसाठी पाच लेवल बनवण्यात आल्या आहेत. या पाच लेवल कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्स या आधारावर असतील.
अशा असतील पाच लेवल -
लेवल 1 - पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेड 25% पेक्षा कमी भरलेले आहेत. या टप्प्यात सर्व व्यवहार खुले करण्यात येतील.
लेवल 2 - पॉझिटिव्हिटी रेट 5% आणि ऑक्सिजन बेड 25% ते 40% भरलेले आहेत, असे जिल्हे
लेवल 3 - पॉझिटिव्हिटी रेट 5% ते 10% आणि ऑक्सिजन बेड 40% हून अधिक भरलेले आहेत. याठिकाणी व्यवहार सायंकाळी ५ वाजता बंद होतील.
लेवल 4 पॉझिटिव्हिटी रेट 10% ते 20% आणि ऑक्सिजन बेड 60% असलेले जिल्हे. सायंकाळी ५ नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार, रविवारी व्यवहार बंद असतील.
लेवल 5 पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्याहून अधिक आणि 75% टक्क्याहून अधिक ऑक्सिजन बेड भरलेले जिल्हे
कोरोना लस घेतलेल्या एकाही व्यक्तीचा मृत्यू नाही! एम्सच्या अभ्यासात काय आलं समोर?
पहिल्या स्तरात मोडणाऱ्या ठिकाणी मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल. मात्र, लोकल सेवेबाबतचा निर्णय त्याठिकाणचं स्थानिक प्रशासन घेईल. सार्वजनिक मैदानं, वॉकींग, सायकलिंग याला परवानगी, 100टक्के क्षमतेनं सरकारी कार्यालये खुली. खेळ, शूटींग, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी, लग्न समारंभ, अंत्यसंस्कार यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध राहाणार नाही.
दुसऱ्या स्तरातील ठिकाणी मॉल आणि सिनेमा हॉलमध्ये ५० टक्केच उपस्थितीची अट राहील.
तिसऱ्या स्तराच्या ठिकाणी दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील. सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील.
चौथ्या स्तरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील आणि अन्य दुकाने बंद राहतील.
पाचव्या स्तरातील ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंतच सुरू राहतील. शनिवार, रविवारी ती बंद असतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown, Maharashtra