मुंबई, 27 नोव्हेंबर : राज्य सरकारने (Maharashtra Government) एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers) पगारवाढीची घोषणा करुन दोन दिवस उलटले तरी अनेक कर्मचारी एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण (Merge) करावं, या मुद्द्यावर ठाम आहेत. त्यामुळे त्यांचा आजही संप (Strike) सुरु आहे. दुसरीकडे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी अखेरचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे काही ठिकाणी कर्मचारी हे पुन्हा कामावर रुजू होण्यास तयार झाले आहेत. पण संप मागे घेऊन पुन्हा कामावर रुजू होण्याच्या निर्णयाला काही संपकरी कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. याच विरोधातून राज्यातील वेगवेगळ्या भागात एसटी डेपोंमध्ये (ST Depo) मोठा गदारोळ होताना दिसत आहे.
उस्मानाबाद बस स्थानकावर आज मोठा गदारोळ बघायला मिळाला. कारण एसटी सुरु केल्याने संपकरी कर्मचाऱ्यांनी बस स्थानकात मोठा गोंधळ घातला. या गोंधळानंतर एक एसटी वाहक बेशुद्ध पडला. त्यामुळे बस स्थानक परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण होतं. दरम्यान या गोंधळात आगार प्रमुख असलेले पांडुरंग पाटील यांना आंदोलक कर्माचाऱ्यांनी धक्काबुक्की केली. तुळजापूर आगारातील बस सुरु झाल्यानंतर उस्मानाबाद-उमरगा बस सुरु करण्यात आली. पण एसटीचं विलीनीकरण झाल्याशिवाय बसस्थानकातून बस बाहेर पडू देणार नाही, असा इशारा संपकरी कर्मचाऱ्यांनी दिला.
हेही वाचा : आतापर्यंत 3215 एसटी कर्मचारी निलंबित तर 1226 जणांची सेवासमाप्त
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आगारातून आज जवळपास 20 दिवसांनी भुसावळ ते बोदवड या मार्गाने बस धावली. पण या बसवर दिपनगरजवळ अज्ञातांनी दगडफेक केली. खरंतर संपामुळे भुसावळ आगारातून गेल्या 20 दिवसांपासून बससेवा बंद होती. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज अखेरचा अल्टीमेटम दिल्याने भुसावळ आगारातील सहा संपकरी एसटी कर्मचारी कामावर हजर झाले होते. भुसावळ आगारातून जळगाव, यावल, बोदवड मार्गावर बस सोडण्यात आल्या होत्या. दरम्यान भुसावळ आगारातून बोदवडकडे निघालेल्या बसवर दिपनगरनजीक अज्ञातांनी दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या.
बीडमध्ये गेल्या 23 दिवसांपासून एसटी सेवा खंडीत होती. त्यानंतर आज बीड डेपोमधून दोन एसटी बस प्रवासी घेऊन रवाना झाल्या. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. जळगावच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही सर्वतोपरी काळजी घेत असल्याचे विभागीय नियंत्रक जगदीश मोरे यांनी सांगितले. या दरम्यान बस स्थानकातून बस जात असताना कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली.
हेही वाचा : रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरण : अर्जुन खोतकरांची ED कडून 12 तास कसून चौकशी
दुसरीकडे बीडमधील संपकरी मात्र ठाम आहेत. "गेल्या 23 दिवसांपासून आमचा संप सुरू आहे, आम्ही घराबाहेर आहोत. आमच्यातील अनेकजण भाड्याच्या खोलीत राहतात. आज पगार नाही, त्यामुळे उद्या आमच्या लेकरा-बाळांना देखील घराबाहेर राहण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आज आम्ही आगारातच चूल मांडून स्वयंपाक करत आहोत. मायबाप सरकारने आमच्या भावनांची कदर करून आमचं शासनात विलीनीकरण करावे. आमची वेतनवाढीची मागणी नाहीच. केवळ शासनात विलीनीकरण करावे. यासाठी आंदोलन करत आहोत. आज आमच्यासमोर खूप अडचणी आहेत", असं म्हणत महिला एसटी कर्मचाऱ्याला अश्रू अनावर झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: महाराष्ट्र