मुंबई, 7 जानेवारी : राज्यात कोरोनाचा संसर्ग काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. कोरोनाबाधितांचा आकडा रोज प्रचंड प्रमाणात वाढताना दिसतोय. राज्यात काल नव्या कोरोनाबाधितांचा संख्या 36 हजारांच्या पार गेली होती. विशेष म्हणजे आज हीच आकडेवारी थेट 40 हजारांच्या पार गेली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात तब्बल 40 हजार 925 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच दिवसभरात 20 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची देखील नोंद झाली. दुसरीकडे महाराष्ट्रात आज दिवसभरात 14 हजार 256 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात दिवसभरात एकही नवा ओमायक्रॉनबाधित रुग्ण नाही राज्यात ओमायक्रॉनचा एकही नवा बाधित आढळलेला नाही. राज्य शासनाने जारी केलेल्या प्रसिद्धपत्रकात याबाबत माहिती जारी करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत 876 ओमायक्रॉनबाधितांची नोंद झालेली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधित 565 बाधितांची नोंद आहे. त्यापाठोपाठ पुणे मनपा हद्दीत 83, पिंपरी चिंचवडमध्ये 45, ठाणे मनपा हद्दीत 36, नागपूर मनपा हद्दीत 30, पुणे ग्रामीण 29, पनवेल 17, नवी मुंबई आणि कोल्हापूर प्रत्येकी 10 अशा वेगवेगळ्या भागांच्या रुग्णांचा समावेश आहे. हेही वाचा : ‘हे आई-बाबांना कळालं तर…’;पालकांच्या भीतीने 10 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या मुंबईत कोरोना कमी होईना मुंबईत गेल्या आठवड्याभरापासून नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली बघायला मिळत आहेत. मुंबईतल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आधीच्या कोरोनाच्या पहिल्या-दुसऱ्या लाटांचाही रेकॉर्ड मोडला आहे. मुंबईत काल कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांचा पार गेला होता. त्यानंतर आज हाच आकडा जवळपास 21 हजारांच्या आसपास आला आहे. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 20 हजार 971 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 17 हजार 616 जणांना लक्षणे नाहीत. तर 1 हजार 395 रुग्णांना आज रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. तसेच मुंबईत दिवसभरात 6 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील विविध जिल्हा-शहरांमध्ये दिवसभरात किती रुग्ण आढळले? परभणी जिल्ह्यात दिवसभरात 29 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर 2 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात सध्या 121 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. भिवंडी शहरात आज दिवसभरात 101 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली. शहरातील सध्या 281 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हेही वाचा : ओमायक्रोन, साधी सर्दी की सीझनल फ्लू? लक्षणांमध्ये फरक कोणते? पुण्यात पिंपरी चिंचवड शहरातही कोरोनाचा प्रचंड उद्रेक बघायला मिळतोय. पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात तब्बल 1 हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतही कोरोना विस्फोट होताना दिसत आहे. केडीएमसी हद्दीत आज दिवसभरात 1 हजार 20 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे गेली आहे. तर दिवसभरात 32 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.