मुंबई, 7 जानेवारी : कोरोनाचा (Corona) ओमायक्रोन (Omicron Variant) हा व्हॅरिएंट जगभर वेगाने पसरत आहे. त्यामुळे कोविड-19च्या (Covid19) रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. अगोदरच्या डेल्टा व्हॅरिएंटच्या (Delta Variant) तुलनेत ओमायक्रोन व्हॅरिएंट सौम्य असल्याचं अनेक तज्ज्ञ सांगत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सहा जानेवारी रोजी सांगितलं, की खासकरून लस घेतलेल्यांमध्ये ओमायक्रोनची लक्षणं सौम्य दिसत आहेत; मात्र म्हणून त्याचं वर्गीकरण सौम्य म्हणून केलं जावं, असं नव्हे. ओमायक्रोन व्हॅरिएंट हा खूप म्युटेशन्ससह (Mutation) तयार झालेला असल्यामुळे सार्वजनिक आरोग्य अधिकारी, तसंच शास्त्रज्ञांनी सांभाळून राहण्याचा इशारा दिला आहे. अनेक लक्षणांमध्ये साधर्म्य असल्यामुळे गोंधळ उडू शकतो, असंही सांगण्यात आलं आहे. साधा सर्दी-ताप, फ्लू किंवा कोविड या तिन्हींमध्ये घसा खवखवणं, नाक गळणं (Runny Nose), अंगदुखी (Body Aches) आणि ताप (Fever) ही लक्षणं (Symptoms) दिसतात. ओमायक्रोनची वेगळी लक्षणं ठोसपणे सांगता येण्यासारखा अभ्यास अद्याप झालेला नाही. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत फ्लूची साथही येते; मात्र गेल्या काही दिवसांत ओमायक्रोनची साथ वाढल्यामुळे लक्षणांमध्ये गोंधळ उडू शकतो. हेही वाचा : आंदोलनाने धुमसणाऱ्या कझाकस्तानमध्ये भयानक रक्तपात, 26 जण ठार, हजारोंना बेड्या डेन्मार्कमधल्या आऱ्हस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधले प्रा. एस्किल्ड पीटरसन यांनी सांगितलं, ‘साधी सर्दी (Common Cold) आणि ओमायक्रोन यांच्यामध्ये फरक करणं अशक्य आहे, असं माझं मत आहे.’ ब्रिटनमधल्या कार्डिफ विद्यापीठातले संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँड्र्यू फ्रीडमन यांनीही हाच मुद्दा अधोरेखित केला. काही समान लक्षणांचं वर्गीकरण येथे केलं आहे. ड्राय कफ : कोविड 19 (वारंवार), फ्लू (वारंवार), सर्दी (कधी तरी) ताप : कोविड 19 (वारंवार), फ्लू (वारंवार), सर्दी (दुर्मीळ) चोंदलेलं नाक : कोविड 19 (दुर्मीळ), फ्लू (काही वेळा), सर्दी (वारंवार) घसा खवखवणं : कोविड 19 (काही वेळा), फ्लू (काही वेळा), सर्दी (वारंवार) श्वास लागणं : कोविड 19 (काही वेळा), फ्लू (आढळलेलं नाही), सर्दी (आढळलेलं नाही) डोकेदुखी : कोविड 19 (काही वेळा), फ्लू (वारंवार), सर्दी (आढळलेलं नाही) अंगदुखी : कोविड 19 (काही वेळा), फ्लू (वारंवार), सर्दी (वारंवार) शिंका : कोविड 19 (आढळलेलं नाही), फ्लू (आढळलेलं नाही), सर्दी (वारंवार) गळल्यासारखं होणं : कोविड 19 (काही वेळा), फ्लू (वारंवार), सर्दी (काही वेळा) डायरिया : कोविड 19 (दुर्मीळ), फ्लू (कधी तरी), सर्दी (आढळलेलं नाही) ब्रिटनमधल्या ZOE कोविड स्टडी अॅपने ओमिक्रॉनबाधितांच्या बाबतीत दोन नव्या लक्षणांची नोंद केली आहे. त्यात नॉशिया आणि भूक मंदावणं या दोन लक्षणांचा समावेश आहे. लंडनच्या किंग्ज कॉलेजमधले संसर्गजन्य रोगतज्ज्ञ टीम स्पेक्टर यांनी सांगितलं, की लशीचे दोन्ही डोसेस घेतलेल्या किंवा बूस्टर डोस घेतलेल्यांच्या बाबतीत ही लक्षणं सर्वसामान्य आहेत. या बाबी लक्षात घेऊन आरोग्यतज्ज्ञांनी असा सल्ला दिला आहे, की संशयितांनी चाचणी करून घेऊन घरात आयसोलेट राहावं. कोरोनाच्या निदानासाठी आरटी-पीसीआर ही टेस्ट सर्वांत विश्वासार्ह आहे. कोरोना जेव्हा सर्वांत जास्त संसर्गक्षम असतो, तेव्हा सर्वांनी काळजी घेऊन इतरांचाही जीव वाचवावा, असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.