मुंबई, 5 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या 25 दिवसांमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आणि अपक्ष असे जवळपास 50 पेक्षा जास्त आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडापासून ते आजपर्यंत त्यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक सुरूच आहे. काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!#MaharashtraFirst
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2022
काय म्हणाले उद्धव ठाकरे? सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात जोरदार टोलेबाजी केली, यात त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. यानंतर आज शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. विधानपरिषद मध्ये दोन्ही जागा जिंकून येतील असं म्हणत होते, आले देखील निवडून. पण 12 मते त्यांनी आधीच बाजूला काढून ठेवली होती. मग यांचं कपटकारस्थान कधीपासून सुरू होतं, काल ते विधानसभेत गुपीत खुललं. उपमुख्यमंत्री त्यांना सांगत होते थांबा, थांबा…गाडीचा ब्रेक फेल झालेला, गाडी थांबते कशाला…रिक्षाचा ब्रेक फेल…त्यावेळेला तीन चाकी सरकार बोलायचे आता तीन चाकी चालवणारा त्यांचा ड्रायव्हर…आता चालवा सरकार, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंसमोर असलेला माईक खेचून घेतला, त्यावरूनही उद्धव ठाकरेंनी टोला हाणला. काल बघितलं ना…पुढ्यातून माईक खेचला. मी मुख्यमंत्री असताना असं कधी झालं नाही. पण काल बघितलं त्यांच्या पुढ्यातून माईक खेचला, त्यांना देखील कळालं नाही. आता माईक खेचलाय उद्या काय खेचतील ते बघा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.