मुंबई, 2 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा उलटफेर झाला आहे. अजित पवार शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजितदादांसह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. भाजप-शिवसेनेसोबत जायचा निर्णय का घेतला? याबाबत अजित पवारांनी थेट उत्तरं दिली आहेत. विरोधकांच्या ठिकठिकाणी बैठका होत आहेत, पण या बैठकांमधून काहीही आऊटपूट निघत नाही. विकासासाठी आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशभरात विकासकामं सुरू आहेत. देशातली आणि राज्यातली परिस्थिती बघता विकासाला पाठिंबा दिला पाहिजे, असं आम्हाला वाटलं. राज्याला केंद्रातून निधी कसा मिळेल, राज्यातील प्रत्येक घटकाला मदत मिळावी, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांचा पक्षावरही दावा लोकसभा, विधानसभा तसंच स्थानिक निवडणुकाही आम्ही भाजप-शिवसेनेसोबत लढणार आहोत. या निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तसंच घड्याळ चिन्हावर लढणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. यातून अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकला आहे. किती आमदारांचा पाठिंबा? राष्ट्रवादीच्या किती आमदारांचा पाठिंबा आहे? असं विचारलं असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं. शरद पवारांचा आशीर्वाद? भाजप-शिवसेनेसोबत जायचा निर्णय घेताना शरद पवारांनी आशीर्वाद दिला का? असा प्रश्न विचारल्यानंतर अजित पवारांनी आम्हाला सगळ्यांनी आशीर्वाद दिले, असं उत्तर दिलं. तसंच याची कल्पना वरिष्ठांना दिली होती, असं विधानही अजित पवारांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.