मुंबई, 11 जुलै : अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. एकेकाळी शरद पवारांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्यांनीही साथ सोडली. यात खासदार-आमदारांपासून अगदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यातही काहीजण असे आहेत, जे अजित पवारांच्या शपथविधीला हजर होते. मात्र, पुन्हा एकदा शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. यात एक महत्त्वाचं नाव आहे, शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रात झंझावाती प्रचार केला. याचा फायदाही राष्ट्रवादीला झाला होता. आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी मोठी जबाबदारी अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर दिली आहे. 2 जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी शपथ घेतली. त्यावेळी शपथविधीला कोल्हे हजर होते. त्याच दिवशी कोल्हे अजितदादांना साथ देतील अशी चर्चा झाली. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी पवारांची भेट घेतली. मी तुमच्यासोबत राहीन, असा शब्द देतानाच भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर त्यांनी घणाघात केला. कोल्हे कोणत्या गटात जाणार याबद्दल मोठी चर्चा असताना आज मात्र ते शरद पवारांच्या बैठकीत सामील झाले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मान्यतेने आगामी निवडणुकांकरिता खा. डॉ. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. आज मा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खा. डॉ. अमोल… pic.twitter.com/WrSNfg3tyk
— NCP (@NCPspeaks) July 11, 2023
कार्यकर्ता मेळाव्यातच जयंत पाटील यांनी दिली होती ऑफर या सगळ्यानंतर जयंत पाटील यांनीही अमोल कोल्हे यांना त्यांच्या निष्ठेचं बक्षीस दिलं. आपल्या पक्षाचं प्रचारप्रमुखपद आपण स्वीकारा अशी ऑफरच जयंतरावांनी अमोल कोल्हेंना दिली. महाराष्ट्र पिंजून काढू, शिवरायांचा विचार सांगू, पुन्हा महाराष्ट्रात आपल्या विचारांचं सरकार आणू… असं जयंतराव म्हणाले. त्यावर कोल्हेंनीही चेहऱ्यावर स्मितहास्य आणून हात जोडून जसा आपला आदेश म्हणत त्यांची ही ऑफर मान्य असल्याचंच एकप्रकारे सांगितलं होतं. हिच ऑफर आता सत्यात उतरली आहे. वाचा - राष्ट्रवादीच्या नवनियुक्त मंत्र्यांना बंगल्याचे वाटप; पाहा ‘वजनदार’ बंगला कुणाच्या वाट्याला अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने आगामी निवडणुकांकरिता खा. डॉ. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खा. डॉ. अमोल कोल्हे यांना सदर नियुक्तीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी खा. सुप्रियाताई सुळे, कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले, पालघर जिल्हा अध्यक्ष आमदार सुनील भुसारा, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव, युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक प्रदेश उपाध्यक्ष अमोल मातेले हे उपस्थित होते.