मुंबई, 21 जून : एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे हे सध्या सूरतमध्ये आहेत, त्यांच्यासोबत शिवसेनेचे (Shivsena) 32 आमदार आहेत, तर 4 अपक्ष आमदार हे उद्या सूरतला पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाराज एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि रवींद्र पाठक यांनी सूरतला जाऊन भेट घेतली. या दोघांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात फोनवर बोलणंही करून दिलं, पण तरीही एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाली नसल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटले, तसंच उद्या दुपारी 1 वाजता तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जर शिवसेनेचे 32 आमदार असतील तर महाविकासआघाडी सरकार अल्पमतात येईल. एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांची शिवसेनेने गटनेतेपदी निवड केली, पण अजय चौधरी यांना गटनेतेपदी नियुक्त करण्याच्या प्रस्तावावार शिवसेनेच्या फक्त 17 आमदारांची स्वाक्षरी होती, असं सांगण्यात येत आहे. 55 पैकी शिवसेनेच्या फक्त 17 आमदारांचीच स्वाक्षरी असेल, तर त्यांचे इतर आमदार कुठे आहेत? हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray