मुंबई, 25 ऑक्टोबर : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे जून महिन्यात महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे-फडणवीस यांच्या शपथविधीनंतर महिनाभरापेक्षा जास्त काळ मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे विरोधकांनीही सरकारवर टीका करायला सुरूवात केली, अखेर शिंदेंचे 9 आणि भाजपचे 9 अशा 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 20 मंत्र्यांवरच सरकारच्या अतिरिक्त खात्यांचा कार्यभार सध्या आहे, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर दिलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, आमचा फॉर्म्युलाही ठरला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मंत्रिमंडळात येण्यासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत, त्यामुळे विस्तारानंतर नाराजी उफाळून येईल, म्हणूनच मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. फडणवीसांनी सांगितला मुहूर्त दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नव्हते. यंदा डिसेंबरमध्ये नागपूरमध्ये दोन आठवड्यांचे अधिवेशन होईल. राज्य सरकारची तर तीन आठवडेदेखील अधिवेशन चालविण्याची तयारी आहे, असे सांगतानाच या अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे त्यांनी सांगितले. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करून मंत्र्यांवरचा कामाचा भार कमी करण्याचे शिंदे-फडणवीस सरकारचे प्रयत्न आहेत. 19 डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे संकेत फडणवीस यांनी दिल्याने इच्छुकांमध्ये आता जोरदार रस्सीखेच रंगणार आहे. फडणवीसांनी मुहूर्त सांगितला, पण मंत्रिमंडळात कुणाची वर्णी? समृद्धी महामार्गाचं लोकार्पण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्याचं लोकार्पण नागपूर ते शिर्डी नोव्हेंबर महिन्यात होईल. हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार आहे, त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सर्वसामान्य प्रवासी, या महामार्गाने नागपूरला येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अयोध्येला जाणार आम्ही लवकरच अयोध्येला रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दिवाळीनिमित्त एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. मनसेसोबत युती? भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसेची युती होणार का? असा प्रश्नही एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी राजाकरण हेल्थी राहिलं पाहिजे, असं उत्तर दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.