मुंबई, 25 ऑक्टोबर : महाविकास विकास आघाडीची सत्तापालट करत सत्तेत आलेल्या शिंदे आणि भाजप सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या 9 आमदारांची मंत्री पदी वर्णी लागली होती तर भाजपच्या 9 आमदारांना संधी देण्यात आली होती. यामुळे बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या गटातील काही मंत्री नाराज झाल्याने धुसफूस सुरू होती. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेेद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यामुळे दिवाळीनंतर दुसरा मंत्रीमंडळ होण्याची शक्यता आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. दरम्यान दोन्ही गटांकडे समान मंत्री असल्याने दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील कोणत्या आमदारांची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपला जास्त जागा मिळाल्यास बाळासाहेबांच्या शिवसेनेत अनेक आमदार इच्छुक असल्याने कोणाकोणाचे समाधान करायचे, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर आहे. फडणवीस यांनी रविवारी नागपूर येथे बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्ट सांगितल्याने यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : मनसेसोबत महायुतीच्या चर्चेला लागणार ब्रेक? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठ विधान
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नव्हते. यंदा डिसेंबरमध्ये नागपूरमध्ये दोन आठवड्यांचे अधिवेशन होईल. राज्य सरकारची तर तीन आठवडेदेखील अधिवेशन चालविण्याची तयारी आहे, असे सांगतानाच या अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे त्यांनी सांगितले.
नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करून मंत्र्यांवरचा कामाचा भार कमी करण्याचे शिंदे – फडणवीस सरकारचे प्रयत्न आहेत. 19 डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे संकेत फडणवीस यांनी दिल्याने इच्छुकांमध्ये आता जोरदार रस्सीखेच रंगणार आहे.
हे ही वाचा : समृद्धी महामार्ग शिर्डीपर्यंत खुला होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
राज्यमंत्री असतानाही शिंदे गटात सामील झालेले बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. आमदार संजय शिरसाट यांची नाराजीही लपून राहिली नव्हती. याशिवाय भरत गोगावले, अनिल बाबर, प्रकाश आबिटकर अशी नावेही चर्चेत होती. आता फडणवीस यांनीच मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सांगितल्याने मंत्रिमंडळात समावेश व्हावा म्हणून दिवाळीनंतर जोरदार लॉबिंग सुरू होणार आहे.