मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सत्तांतरानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाला नेमकं काय मिळालं, बंडखोरीचा फायदा की तोटा?

सत्तांतरानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाला नेमकं काय मिळालं, बंडखोरीचा फायदा की तोटा?

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

राज्य मंत्रिमंडळात शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे. सरकार स्थापन होण्याआधीच ते जाहीर करण्यात आलं होतं. पण त्या व्यतिरिक्त शिंदे गटाकडे कोणती खाती मिळालं हे देखील महत्त्वाचं आहे.

  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 14 ऑगस्ट : महाराष्ट्रात दीड महिन्यांपूर्वी भलामोठा राजकीय भूकंप घडला होता. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन भाजपसोबत हातमिळवणी केली होती. त्यांना शिवसेनेतील जवळपास 40 आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेत मोठं खिंडार पाडलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील नवं सरकार स्थापन झालं. हे सरकार स्थापन करण्यात एकनाथ शिंदे गटाचं मोठं योगदान आहे. त्यांनी खूप मोठी रिस्क घेतली. पण एवढी मोठी रिस्क घेतल्यानंतरही त्यांच्या गटाला नेमकं काय मिळालं? त्यांचा काही फायदा झाला का? याचा विचार होणं जास्त आवश्यक आहे. कारण राज्य मंत्रिमंडळासाठी खातेवाटप जाहीर झालं आहे. या खातेवाटपात शिवसेनेच्या नेत्यांना फार मोठे महत्त्वाचे खाते देण्यात आलेत, असं चित्र नाहीय. आणि वास्तव आहे. राज्य मंत्रिमंडळात शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे. सरकार स्थापन होण्याआधीच ते जाहीर करण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातं देण्यात आलं आहे. हे खातं त्यांच्याकडे याआधीच्या सरकारच्या काळातही होतं. याशिवाय त्यांच्याकडे आणखी काही खाती आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडी काळात जे मंत्री होते त्यांना नेमकं काय मिळालंय ते देखील महत्त्वाचं आहे. (खातेवाटपानंतर एकनाथ शिंदेंचे 5 मंत्री नाराज, एकाचा फोन स्विच ऑफ) शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्याकडे महाविकास आघाडीच्या सत्तेत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचं मंत्रिपद होतं. आतादेखील त्यांना याच विभागाचं मंत्रिपद मिळालं आहे. दादा भुसे यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात महत्त्वाचं खातं होतं. त्यांच्याकडे कृषी विभागाची जबाबदारी होती. पण या सरकारच्या काळात त्यांना बंदरे व खनिकर्म विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. कृषी विभागाची जबाबदारी ही शिंदे गटातीलच नेते अब्दुल सत्तार यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे हे खातं शिंदे गटाकडे राहिलं आहे. महाराष्ट्रात सत्तांतराच्या वेळी महत्त्वाची भूमिका निभवणारे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्याकडे आधी मंत्रिपद नव्हतं. त्यांना यावेळी मंत्रिपद मिळालं आहे. त्यांना शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचं मंत्रिपद मिळालं आहे. पण या खातेवाटपावर ते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (देवेंद्र फडणवीस चमकले, भाजपकडे तगडी खाती, मुख्यमंत्र्यांकडेही भरपूर काही, पण...) शंभूराज देसाई हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहराज्यमंत्री होते. या सरकारमध्ये त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात वन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण ते खातं या सरकारमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. उदय सामंत यांना उद्योग मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे आधी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचं मंत्रिपद होतं. पण ते खातं भाजपच्या चंद्रकांत पाटलांना देण्यात आलं आहे. संदीपान भुमरे यांना रोजगार हमी योजना व फलोत्पादन खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. पण यावर ते समाधानी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भुमरे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shiv sena

पुढील बातम्या