निष्ठावंत असल्यानेच भाजपने केला 'कोल्ड मर्डर'; स्मिता वाघ यांची टीका

निष्ठावंत असल्यानेच भाजपने केला 'कोल्ड मर्डर'; स्मिता वाघ यांची टीका

जळगाव मतदारसंघातून भाजपने अखेरच्या क्षणी उमेदवारी मागे घेतल्याने 'हेची काय फळ मम तपा'ला असा सवाल स्मिता वाघ यांनी केलाय.

  • Share this:

राजेश भागवत, जळगाव, 4 एप्रिल : ऐन वेळी उमेदवारी नाकारल्याने भाजपच्या जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ कमालीच्या नाराज झाल्या आहेत. ही नाराजी त्यांनी आज अत्यंत कडक शब्दात बोलून दाखवली. त्या म्हणाल्या, भारतीय जनता पक्षात आम्ही चाळीस वर्षापासून काम करीत आहोत, निष्ठेने काम करीत आहोत, परंतु एबी फॉर्मसह अर्ज भरलेला असतांना आमचे तिकीट कापून चार वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली. आमचा हा "कोल्ड मर्डर'च आहे.

असं असलं तरीही आम्ही पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा निष्ठेने प्रचार करणार आहोत असं मतही त्यांनी व्यक्त केलं. त्यांच्या वक्तव्याची चर्चा होऊ लागल्याने नंतर मात्र असं वक्तव्य केलंच नाही असं घुमजाव स्मिता वाघ यांनी केलं.

भाजपने जळगाव लोकसभा मतदार संघातील आपल्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाने घेतलेल्या या निर्णयाबाबत आमदार स्मिता वाघ यांचे समर्थक नाराज झालेत.

नाराज कार्यकर्त्यांचं आंदोलन

जळगावात त्यांच्या निवासस्थानी जळगाव लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते जमले होते. त्यांनी पक्षाच्या या निर्णयाविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला. निष्ठेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना हेच फळ काय? असे मतही कार्यकर्त्यानी व्यक्त केले.

यावेळी बोलतांना आमदार स्मिता वाघ म्हणाल्या, मी पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती आहे. गेल्या चाळीस वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपण कार्य करीत आहोत. पक्षाने आपल्याला लोकसभेची उमेदवारी दिली, अर्ज दाखल करून आपण प्रचारास सुरुवातही केली होती.

तब्बल शंभर गावे आपण प्रचार केला, प्रत्येक घरी भेट दिली, आणि आता आपल्याला पक्षाने उमेदवारी रद्द केल्याचे कळविले आहे. आपल्याला उमेदवारी नाकारल्याचे वाईट वाटत नाही परंतु ज्या पध्दतीने ते नाकारण्यात आले आहे. त्याचे वाईट वाटते.आम्ही निष्ठावान आहोत, त्यामुळेच पक्षाने आमची उमेदवारी कापली आहे, अशी आमची खात्री झाली आहे. अगोदरच नकार दिला असता तर वाईट वाटले नसते.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपातील गोंधळाचे वातावरण काही केल्या शांत होताना दिसत नाही. वाघ यांच्या नाराज समर्थकांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली. परंतु वाघ यांनी सर्व कार्यकर्त्यांची समजूत घातल्यामुळे तणाव निवळला.

First published: April 4, 2019, 7:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading