नवी दिल्ली, 3 जून : पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ अखेर महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हे वादळ धडकले आहे. वादळामुळे मुंबईसह उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. पुढील सहा तास या वादळाचा प्रभाव कायम राहणार आहे. आज दुपारी रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग जवळून ताशी 100-110 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह निसर्ग चक्रीवादळ अखेर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकले आहे. उत्तर पूर्व अरबी समुद्र आणि दक्षिण गुजरात किनाऱ्यावर समुद्र खवळलेला असून 1 ते 2 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. हेही वाचा - मुंबई, ठाणे, नाशिकसाठी पुढचे 4 तास महत्त्वाचे! या गोष्टी केल्यात का? या वादळामुळे कच्ची घरे आणि झोपड्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक भागात घरावरची पत्रे उडून गेली आहे ,तर काही ठिकाणी वीज आणि दूरध्वनी तसेच संपर्क साधनांच्या तारांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी, अलिबाग परिसरात मोठ-मोठी झाडे, उन्मळून पडली आहे. वादळ धडकल्यानंतर काय ? हे तीव्र चक्रीवादळ धडकल्यानंतर सहा तास त्याची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावा मुळे पुणे, अहमदनगर जिल्ह्यात ताशी 60-70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून हा वेग 80 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. बीड, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात ताशी 55-65 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. हेही वाचा - पैशापुढे जीव झाला स्वस्त, रस्त्यात दुचाकी अडवून तरुणावर तलवारीने सपासप वार महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात नुकसान होण्याची शक्यता असून त्यासंदर्भात घ्यायची काळजी घेण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन घरातच राहावे असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.








