कोल्हापूर, 24 जानेवारी : कोल्हापूर हे शहर त्याच्या परंपरांमुळे जगात भारी आहे. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कोल्हापुरात एक परंपरा पाहायला मिळते. या दोन्ही दिवशी कोल्हापुरात चौका चौकात मोठ्या प्रमाणात जिलेबीचे स्टॉल लागतात. कोल्हापूरच्या मिठाईवाल्यांची त्या दिवशीच्या जिलेबीसाठीची तयारी जोर धरू लागते. जसं कोल्हापूरचे नाते तांबड्या पांढऱ्या रश्श्याबरोबर जोडले जाते. तेवढेच किंबहुना त्याहूनही जास्तीचे नाते हे कोल्हापूर आणि राष्ट्रीय सणांच्या वेळी खाल्ल्या जाणाऱ्या जिलेबीचे आहे कोल्हापूरचं नातं तांबड्या पांढऱ्या रश्श्याबरोबर जोडलं जाते.या नात्या इतकेच किंवा त्यापेक्षा जास्त कोल्हापूरचं नातं हे राष्ट्रीय सणाच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या जिलेबीचं आहे. 26 जानेवारी दिवशी सकाळी लवकर उठायचे, ध्वजवंदन करायला जायचे. परेड बघायची आणि घरी परत येताना गरमागरम जिलेबी घेऊनच परत यायचे. असा अलिखित नियमच कोल्हापूरकरांच्या अंगवळणी पडला आहे. गरीब, श्रीमंत, कष्टकरी किंवा व्यापारी प्रत्येक कोल्हापूरकरच्या घरी त्या दिवशी जिलेबी खाल्ली जाते. आयुष्यात वडापाव नाही खाल्ला तर काय खाल्लं! मुंबई-पुण्यातील बेस्ट 10 वडापाव चुकूनही मिस करू नका! कशी सुरू झाली परंपरा? कोल्हापूर ही कुस्तीपंढरी आहे. उत्तरेकडील अनेक मल्ल इथं कुस्तीत आपले नशीब आजमावण्यासाठी येतात. उत्तर भारतीयांच्या खानपानात जिलेबी हा गोड पदार्थ हमखास असतो. जवळपास 50 वर्षांपूर्वी रामचंद्र बाबाजी माळकर यांचं कोल्हापूर महानगरपालिका चौकात फक्त जिलेबीसाठी प्रसिद्ध हॉटेल होतं. हा परिसर आता माळकर तिकटी या नावानं जिलेबीसाठी ओळखला जातो. माळकरांची तिसरी पिढी हा व्यवसाय आता करते. ‘राष्ट्रीय सणाच्या दिवशी आमच्या एका दुकानात एकाच दिवसात 10 ते 15 हजार किलो जिलेबीचा खप होतो. त्यावरुन एकाच दिवशी कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यात किती जिलेबी विकली जात असेल, याचा अंदाज येईल, असं योगेश माळकर यांनी सांगितलं.
कोल्हापुरात माळकर यांच्या हॉटेलमध्ये जिलेबीसाठी गर्दी होत असे. पुढे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला शहरात जिलेबीचे स्टॉल लागू लागले. त्यानंतर ही परंपराच बनली असून ती आजपर्यंत सुरू आहे. दरवर्षी दोन्ही राष्ट्रीय सणांच्या दिवशी रस्त्यावरून जाताना जिलेबीचा सुटलेला घमघमाट आणि स्टॉलवर सुरू असणारी देशभक्तीपर गाणी यामुळे एक वेगळाच माहोल बनलेला असतो. कोल्हापूरकरांनी जपलेल्या या अशा अनोख्या परंपरेमुळे कोल्हापूरचे नाव आजही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचत आहे, हे मात्र नक्की..