amrurज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधीकोल्हापूर, 15 जुलै : शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर खोचक शब्दांमध्ये टीका केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे दिल्लीत असलेल्या केंद्रीय मंत्र्यांवर नाव न घेता टीका केली. "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून माईक ओढतात, उद्या पॅन्ट ओढतील, नागडे करून सोडतील. खोक्यांना बळी पडलेल्यांचे राजकीय आयुष्य नाही", अशा शेलक्या शब्दांमध्ये विनायक राऊत यांनी टीका केली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा उल्लेख करत टीका केली.
"मला अमृता फडणवीस यांचे वाईट वाटते. त्यांनी किती नवस केले. पण फडणवीस हे बहुरूपी आहेत. हे दिल्लीने सिद्ध केले. दिल्लीने फडणवीसांचा बकरा केला. तुम्हाला हाताखाली काम करावं लागतंय. फडणवीस यांच्या सारख्या निष्ठावंताची अवहेलना होते हे बघवत नाही. लाथ मारा यांना, काय असते निष्ठा हे दाखवून द्या", असा सल्ला राऊतांनी दिला.
"एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा मुर्दा पाडला. त्यांनी कपाळावर टिळा लावण्याचा नैतिक अधिकार गमावला. त्यांनी संभाजीनगरचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. जनाची ना मनाची वाटायला हवी. लाचारी पत्कारली पण दिघे साहेबांचे तरी स्मरण करा", अशी टीका विनायक राऊत यांनी केली.
विनायक राऊत यांनी राजेश क्षीरसागर यांच्यावरही टीका केली. "कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत बेईमानीची कीड मी स्वतः अनुभवली. घरी जेवायला बोलवून खर्च दुसऱ्याकडून करायचा, ही क्षीरसागर यांची वृत्ती. मला आणि नाना पटोलेंना घरी घातलेल्या जेवणाचा खर्च बंटी पटलांकडून घेतला", असा घणाघात राऊतांनी केला.
"चंद्रकांत पाटील यांच्या अनेक पिढ्यांचा राजेश क्षीरसागर यांनी जितका केला तितका उद्धार कोणी केला नसेल, आणि आज चुंबाचुंबी करायला तयार", अशी खोचक टीका विनायक राऊत यांनी केली.
(दीड तास फडणवीस-राज ठाकरेंमध्ये काय चर्चा झाली? भेटीनंतर फडणवीस सिद्धिविनायकाच्या दर्शनाला)
विनायक राऊत यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर, अबिटकर यांच्यावर सुद्धा टीका केली. "सगळ्यांना मंत्रीपदाचे अमिश दाखवून शिंदे स्वतः रवन बसले. काही दिवसांनी यातले काही अंडी नासतील", अशी टीका त्यांनी केली.
"द्रौपदी मुर्मू या अभ्यासू आदिवासी महिला आहेत. त्यांचा सन्मान होत आहे. त्यामुळे सेनेने पाठिंबा दिला. भाजपचा दबाव नाही. जवळीक नाही. किती राहिलेत याचा विचार नाही, किती राहतील याचा विचार नाही. दिल्लीच्या तख्तासमोर लोटांगण घालणारी सेना नाही", असं राऊत म्हणाले.
"दीपक केसरकर पोपटपंची करत आहे. आता नरेंद्र मोदी यांचे सल्लागार झालेत. कोकणातले बुटकेश्वर गप्प झालेत. नारायण राणे यांच्यासारखे बेईमान लोकांना गाडून शिवसेना तिथे आपले आमदार निवडून आणणार. प्रत्येकाने आपापल्या बापाचे नाव लावून पक्ष काढा. भाजपच्या पापाचे वाटेकरी होत आहात. अत्यंत क्रूर राजनीती दिल्लीचे नेते खेळत आहेत", असं विनायक राऊत म्हणाले.
"उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्याचा आसुरी आनंद दिल्लीश्वर लुटत आहेत. त्यात तुम्ही कसे काय सहभागी होता. उद्या रस्त्यावर तुम्ही भीक मागत फिराल. तुमच्या खोख्यातील पैसे संपून जातील. पण उद्धव ठाकरे एकटे पडणार नाहीत. महाराष्ट्रावर सूड उगवायचा आहे. दिल्लीकर महाराष्ट्राचे तुकडे करत आहेत. 40 चोर यामध्ये सामील झाले आहेत. महाराष्ट्राला हात लावण्याचा प्रयत्न केला तर सेना गप्प बसणार नाही. मुंबईवर महाराष्ट्राचाच कब्जा राहील. सर्वोच्च न्यायालयात हे सगळे अपात्र ठरतील", असा दावा विनायक राऊतांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.