कोल्हापूर, 16 एप्रिल : संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीला लोक कंटाळले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी शरद पवार यांच्या गाडीत बसलेल्या अभिजित पाटलांना थेट आमदाराकीची ऑफर दिली आहे. कुठेही फिरत बसू नका तुम्हाला आमदार करण्याची जबाबदारी आमची असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या या ऑफरनंतर राजकीय वतृळात चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले संभाजीराजे? संभाजीराजे छत्रपती यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीला लोक कंटाळले आहेत, तुम्ही काय करता यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, आत्महत्या थांबल्या पाहिजेत, शैक्षणिक धोरण सुधारलं पाहिजे. मात्र सगळे पुढारी वेगवेगळे बोलत आहेत, असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. ग्रामीण आरोग्य केंद्र सुसज्ज हवे आहेत, मात्र तसे दिसत नाही. धाराशिव आरोग्य केंद्राबाबत ट्विट केल्यानंतर मंत्री तानाजी सावंत यांनी फोन करून धाराशिव सोबत राज्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सुधारणा करतो अशी माहिती दिल्याचंही यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं.
अभिजित पाटलांना ऑफर दरम्यान अभिजित पाटील यांना संभाजीराजे छत्रपती यांनी थेट स्वराज्य पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. कुठं ही फिरत बसू नका, तुम्हाला आमदार करण्याची जबाबदारी आमची. असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.