कोल्हापूर, 01 एप्रिल : 'संयोगीताराजे राजकारणाच्या पलीकडच्या आहेत. हा गैरसमज नाही. मला बोलायला लावू नका. पुजारी फक्त कोल्हापुरात येऊन बोलू देत, मग मी सत्य काय ते बाहेर काढतो, असं म्हणत स्वराज्य संघटनेचे संस्थापक आणि माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपतींनी ठणकावून सांगितलं.
'संयोगीताराजेंनी नाशिकमध्ये अनेक मंदिरांत गेल्या होत्या. संयोगीताराजेंना जो अनुभव आला, त्याबद्दल त्यांनी आपल्या भावना परखडपणे मांडल्या आहेत. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा आहे. हा संतांचा महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्रात आकृत्य करणारे लोक का तयार होतात. असे होऊ नये अशी अपेक्षा. जो त्रास शाहू महाराजांना झाला 100 वर्षाने ते पुन्हा घडले, असं म्हणत संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली.
(सावरकरांवरून वाद, विरोधकांच्या बैठकीत काय झालं? पवारांनी सांगितली Inside Story)
आशा घटना घडू नयेत यासाठी पुरोहित महंतांनी काम करावे. माझा वाढदिवस असल्याने त्यावेळी वातावरण गढूळ होऊ नये म्हणून त्या बोलल्या नाहीत. छत्रपती सोबत अनेक जण फोटो काढू शकतात. मी घेऊ का पत्रकार परिषद. संयोगीताराजे राजकारणाच्या पलीकडच्या आहेत. हा गैरसमज नाही मला बोलायला लावू नका, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला.
(सत्यजीत तांबेंचं 'जय श्रीराम', राम नवमीलाच भाजप प्रवेशाचा सेतू!)
'महंतावर गुन्हे किती आहेत हे तपासा मंदिरातील अकृत्य बंद होण्याची गरज आहे. मंदिरात सामान्य माणसाचा अधिकार द्या आणि पगारी पुजारी नेमायला हवेत. यावर सरकारचे नियंत्रण हवे, अशी मागणीही संभाजीराजेंनी केली.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मतदारसंघात काय घडलं. याबद्दल आम्ही खुलासा केला. त्यानंतर त्यांचा मला फोन आला. पुन्हा आशा घटना घडणार नाहीत हे सांगितले आहे, असंही संभाजीराजेंनी सांगितलं.
काळाराम मंदिरात काय घडलं संयोगिताराजे यांच्यासोबत?
'नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला.अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला.शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच'.
'तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली.या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे… अजूनही खूप प्रवास बाकी आहे...अजून खूप चालावे लागणार आहे… हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे'! असं संयोगीताराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.