हरीश दिमोटे, प्रतिनिधी
अहमदनगर, 1 एप्रिल : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार सत्यजित तांबे रामनवमीच्या दिवशी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत संगमनेरात प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सत्यजित तांबेंची आता पुढील वाटचाल "जय श्रीराम " म्हणत होणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
नाशिक पदवीधर मतदारसंघाची अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. तेव्हापासूनच काँग्रेस किंवा राज्यातील पक्षश्रेष्ठीपासून तांबेचा दूरावा वाढलेला आहे. 22 वर्षे ज्या काँग्रेस पक्षासाठी सत्यजित तांबे यांनी दिवसरात्र एक केले आणी पक्षसंघटन बांधले त्यांना मात्र नाशिक पदवीधर निवडणूकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही, त्यामुळे सत्यजित तांबे नाराज आहेत. या अगोदर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान सत्यजित तांबे यांनी आपली नाराजी बोलूनही दाखवली होती.
अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सत्यजित तांबेंना भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवडणुकीत उघड पाठींबा दिला होता आणी त्यांचा प्रचारही केला. सत्यजित तांबे यांचा विजय झाल्यानंतर तांबे यांनी भाजपात यावं, असं आवाहनही विखे पाटील यांनी केलं होतं.
आता त्याच दृष्टीने सत्यजित तांबे यांची वाटचाल सुरू झालीय का? असा प्रश्न पडलाय, कारण निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच सत्यजित तांबे आणी विखे पाटील एका ठिकाणी भेटले आहेत. कारण होतं श्रीरामनवमीचे. संगमनेर शहरातील श्रीराम मंदिरात विखे पाटील आणी सत्यजित तांबे एकाचवेळी पोहचले, दर्शन घेऊन दोघेही मिरवणूकीत सहभागी झाले.
खांद्यावर भगवा
कायम खांद्यावर काँग्रेसची शाल पांघरणाऱ्या सत्यजित तांबे यांच्या खांद्यावर मात्र भगवी शाल दिसली. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसचे जेष्ठ नेते मामा बाळासाहेब थोरात यांचा हात सोडून भाचा सत्यजित तांबे भाजपचा हात धरून "जय श्रीराम " करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.