साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर,30 मार्च : उत्सव की कर लो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी, अशा वातावरणात कोल्हापुरात यंदाची रामनवमी साजरी होत आहे. कोल्हापुरात जवळजवळ सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतात. त्यातीलच एक हिंदू धर्मीय बांधवांच्या साठी महत्त्वाचा दिवस म्हणजे रामनवमी. हा दिवस कोल्हापुरात विविध सांस्कृतिक, धार्मिक, कार्यक्रमांनी साजरा होत असतो.
यंदा रामनवमी जन्मोत्सवासह गुरु पुष्य योग, अमृत सिद्धी योग, रवियोग, सर्वार्थ सिद्धी असे योग एकत्रितपणे आले असल्यामुळे रामनवमी उत्सव साजरा करण्यासाठीचा उत्साह अजूनच वाढला आहे. कोल्हापूर शहरात देखील रामनवमीच्या उत्सवाचे वातावरण आहे.
जागोजागी भव्य पोस्टर्स
कोल्हापूरच्या गंगावेश चौकात रामनवमीनिमित्त भले मोठे पोस्टर उभारण्यात आले आहे. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम, उत्तरेश्वर गवत मंडई मित्र मंडळ आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने हे पोस्टर उभारण्यात आले आहे. अंदाजे 20 फूट उंच आणि जवळपास 50 फूट रुंद असे हे भव्य पोस्टर आहे. या पोस्टरद्वारे धर्मो रक्षति रक्षितः असा संदेश देण्यात आला असून पोस्टरवर श्रीराम, हनुमान यांच्या सोबतच छ्त्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या प्रतिमा आहेत.
तर शहरातील कसबा बावडा परिसरात देखील जयतु हिंदूराष्ट्र अशा शिर्षकाचा भला मोठा फ्लेक्स उभारण्यात आला आहे. या पोस्टरवर देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमे सोबत महाराणा प्रताप यांचीही प्रतिमा आहे. तर अंदाजे 30 ते 35 फूट उंच अशा या पोस्टरच्या माध्यमातून सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Ram Navami Wishes : श्रीराम नवमीनिमित्त WhatsApp Status ला ठेवा सुंदर शुभेच्छा संदेश
21 फुटी श्री राम मूर्ती
या सोबतच चिले कॉलनीतील श्रीराम तरुण मंडळ यंदा भव्य 21 फुटी श्रीराम मूर्ती उभारुन रामनवमी उत्सव साजरा करत आहे. आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन झाल्यानंतर दर्शनाला खुली करण्यात आली.
शोभायात्रा आणि गुढीची परंपरा
रामनवमीनिमित्त सकल हिंदू समाज व हिंदुत्ववादी संघटनांतर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन कोल्हापुरात करण्यात आले आहे. तर कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील नागरिकांची रामनवमीनिमित्त गुढी उभारण्याची परंपराही कायम असणार आहे.
श्रीरामानं 'या' मंदिरात केली होती शिवलिंगाची पूजा! पाहा काय आहे आख्यायिका, Video
दरम्यान कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात विविध राम मंदिरात रामनवमीचा उत्सव भजन, कीर्तन, जन्म सोहळा आणि महाप्रसाद अशा जल्लोषात साजरा होत आहे. त्यामुळे कोल्हापूर हे रामनवमीनिमित्त राममय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Local18, Ram Navami 2023