नारायण काळे, प्रतिनिधी
जालना, 25 मार्च : महाराष्ट्रामध्ये अनेक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहेत. यापैकी एक जालना जिल्ह्यातील मौजपुरी परिसरातील रामेश्वर मंदिर आहे. अतिशय प्राचीन असे हेमाडपंथी मंदिर असलेले रामेश्वर मंदिर परिसरातील श्रद्धाळू यांचे श्रध्दास्थान असून भाविकांची इथे नेहमीच गर्दी असते. प्रत्यक्ष प्रभू श्रीराम चंद्र यांनी येथील शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली अशी आख्यायिका सांगितली जाते. ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी या जीर्ण मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिर उभारले आहे. काय आहे या पुरातन मंदिराचे महत्व पाहुयात.
काय आहे महत्व?
कल्याणी नदीच्या तीरावर वसलेल्या या मंदिराच्या समोर विस्तीर्ण असे नदीपात्र आहे. नदीपात्रात नेहमी पाणी असते. यामुळे या मंदिराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी दूरदूर वरून भाविक इथे येतात. श्रीरामाचे महत्व, शिवाची आराधना आणि लोभस निसर्ग सौंदर्य असा त्रिवेणी संगम इथे पाहायला मिळतो. प्रभू रामचंद्र जेव्हा वनगमन करत होते तेव्हा ते इथे आले. इथला परिसर त्यांना रमणीय वाटला. इथेच पूजेसाठी म्हणून शिवलिंगाची प्रतिष्ठापना त्यांनी केली होती अशी आख्यायिका सांगितली जाते, अशी माहिती मंदिराचे पुजारी विठ्ठल गुरव यांनी दिली.
भव्य मंदिर
या ठिकाणी सोनारी म्हणून एक डोह होता. ज्यात भरपूर प्रमाणात माशा असायच्या या माशांना कुणीही पकडत नसे. जो कुणी या माशांना पकडायचा त्याची दृष्टी जायची अशीही आख्यायिका इथे प्रचलित आहे. प्राचीन हेमाडपंथी मंदिराची जीर्ण अवस्था पाहून गावकऱ्यांनी हे भव्य मंदिर उभं केले आहे, असंही विठ्ठल गुरव यांनी सांगितले.
शिळा जोडून या मंदिराची उभारणी
हेमाडपंथी मंदिराची जीर्ण अवस्था पाहून परिसरातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून या मंदिराला भव्य स्वरूप प्राप्त करून दिले आहे. त्यासाठी राजस्थान येथून शिळा मागवण्यात आल्या होत्या. तसेच मंदिराची उभारणी करण्यासाठी सिमेंटचा वापर करण्यात आलेला नाही. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या धर्तीवर फक्त शिळा जोडून या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांचे प्रयत्न आणि पंचक्रोशीतील लोकांच्या सहकार्याने अतिशय भव्य मंदिराबरोबरच रमणीय परिसर देखील तयार करण्यात आला आहे.
इथे चक्क शिवभक्त राक्षसाची करतात पूजा, पाहा शंभू महादेव मंदिराची आगळी वेगळी आख्यायिका, Video
हे अतिशय प्राचीन असे मंदिर आहे. आजुबाजुच्या परिसरात या मंदिराचा मोठा नावलौकिक आहे. प्रत्यक्ष प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने हा परिसर पावन झाला आहे. इथेच पूजेसाठी म्हणून शिवलिंगाची प्रतिष्ठापना रामाने केली होती अशी आख्यायिका सांगितली जाते. म्हणून या मंदिराचे नाव रामेश्वर असे पडले, असं ज्ञानेश्वर महाराज बारड यांनी सांगितले.
कुठे आहे मंदिर?
जालना शहरापासून अवघ्या 20 किमी अंतरावर रामेश्वर मंदिर आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.