कोल्हापूर, 29 ऑक्टोबर : बालकांमधील गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स अर्थात मराठीत गुळणी येणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. बालकाच्या एक वर्ष वयापर्यंत व वाढीनुसार ही बाब आपोआप कमी होते. यामध्ये जठरातील अन्नघटक बालकाच्या मुखाशी येतात. बहुतांश वेळा ते घटक वर येऊन पुन्हा एकदा जठरात जातात. त्यावेळी बालके अस्वस्थ होतात, चिडचिडे बनतात, रडायला लागतात. कधी कधी ते अन्नघटक फुफ्फुसांमध्ये जाऊन निमोनिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे सर्व संभाव्य धोके टाळण्यासाठी कोल्हापूरच्या डॉक्टरांच्या एका टीमने एक नवीन स्मार्ट पाळणा बनवला आहे. कोल्हापुरातील नवजात शिशुतज्ञ आणि बालरोगतज्ञ डॉ. विजय माळी, कॅन्सर संशोधक डॉ. अभिनंदन पाटील, स्तनपान विशेषज्ञ आणि बालरोग तज्ञ डॉ. स्नेहल विजय माळी आणि इंजिनिअर सोहेली पाटील यांनी हा पाळणा तयार केला आहे. डॉ. विजय माळी आणि अभिनंदन पाटील हे कोल्हापुरातील डॉ. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज मध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांच्या या पाळण्याच्या प्रोटोटाईपला जिल्हा आणि राज्य पातळीवर स्टार्टअप यात्रा 2022 मध्ये प्रथम क्रमांक देखील मिळाला आहे. डॉ. माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली पाच वर्षे हा पाळणा बनवण्यासाठी संशोधन केले आहे. 500 पेशंट्सचा अभ्यास करून आणि 50 पेशंट्सवर चाचणी घेऊन हा पाळणा बनवण्यात आला आहे. Video : मूर्ती लहान किर्ती महान! बारावीतील मुलीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद हा पाळणा नेमका आहे काय ? हा एक छोटा पाळणा आहे. विशिष्ट अँगल आणि न्यूरो काँटम बायोलॉजी या शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून त्याची रचना केली आहे. यासाठी वापरण्यात आलेले कापड देखील बाळासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. बालक जागे आहे की झोपले आहे, यावर त्या पाळण्याचा अँगल आपण ठरवू शकतो. 30, 40, 60 अशा 3 वेगवेगळ्या अंशाच्या कोनात आपण या पाळण्याची स्थिती ठेवू शकतो. बालकांना या पाळण्याचा कसा होतो फायदा ? या स्मार्ट पाळण्यामुळे सगळ्यात महत्वाचा फायदा हा होतो की, बाळाला सारखा होणारा गुळणीचा त्रास थांबतो. बाळाचे रडणे, चिडचिड करणे हे देखील या पाळण्यामुळे कमी होते. त्याचबरोबर त्याला शांत झोप लागायला देखील मदत होते.
‘या’ गावानं महिला सक्षमीकरणात कमावलं नाव!, महिलांसाठी राबविले अनोखे उपक्रम, पाहा Video
मुलांची शांत झोप, चिडचिड थांबवण्यासाठी उपयुक्त तेरा वर्ष नवजात शिशुतज्ञ म्हणून काम करताना आम्हाला असं आढळलं की, 30 ते 40 टक्के बालकांमध्ये ही गुळणीची समस्या असते. त्यासाठी आम्ही हा पाळणा तयार केला आहे. 3 वेगवेगळ्या अँगलमध्ये आपण बालकाला या पाळण्यात झोपवू किंवा बसवू शकतो. याचा मुख्य उद्देश हा गुळणी थांबवणे हा होता. तो साध्य झालाच पण हे तंत्रज्ञान मुलांची शांत झोप, चिडचिड थांबवण्यासाठी उपयुक्त ठरते, असं नवजात शिशुतज्ञ आणि बालरोगतज्ञ डॉक्टर विजय माळी सांगतात. अगदी नवजात बाळापासून 2 वर्षाच्या बाळापर्यंत वापर जवळपास 50 जणांवर ट्रायल, तर 500 पेशंट्सचा अभ्यास यावरून आम्हाला असे लक्षात आले की, ठराविक अँगलला ठेवल्यानंतर बाळाचं रडणं थांबू शकतं. त्यामुळे काँटम बायोलॉजी तंत्रज्ञान वापरून आम्ही हा पाळणा बनवला. त्यामुळे बाळासाठी पुढे-मागे आणि वर-खाली अशी बाळासाठी उपयुक्त हालचाल आपण या पाळण्याच्या साहाय्याने ठेवू शकतो. हा पाळणा अगदी नवजात बाळापासून 2 वर्षाच्या बाळापर्यंत आपण वापरू शकतो. याची 15 किलोची क्षमता आहे. त्याचबरोबर हा पाळणा इको फ्रेंडली आहे, स्तनपान विशेषज्ञ आणि बालरोगतज्ञ डॉ. स्नेहल विजय माळी यांनी सांगितले.
Aurangabad : टेन्शन संपलं! एका क्लिकवर मिळतील मुलांसंबंधीच्या प्रश्नांची उत्तर, Video
डॉ. माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बनवलेल्या या पाळण्याला अमेरिकन पेटंट मंजूर झाले आहे. तर भारतीय पेटंटसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पुढच्या काही महिन्यांमध्ये हा पाळणा बाजारात उपलब्ध होईल. या पाळण्याची किंमत जवळपास 2000/- असू शकते. लहान बालकांना होणारा त्रास थांबवणाऱ्या अशा या स्मार्ट पाळण्यामुळे बऱ्याचशा पालकांना फायदा होणार हे मात्र नक्की आहे.