साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 02 मार्च : आई आपल्या मुलासाठी नेहमीच धावून येत असते. अशीच एक आई सध्या आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धडपड करत आहे. कोल्हापूर च्या एका मातेला आपल्या मुलाला स्वतःची किडनी द्यायची आहे. पण प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारा खर्च हा सध्या अडथळा ठरत आहे. कोल्हापूरच्या शाहुवाडी तालुक्यातील नांदारी येथे राणे कुटुंबीय राहतात. गावातील हे शेतमजूर कुटुंब सहसा सर्वांना परिचित आहे. काही महिन्यापूर्वी या कुटुंबातील एकुलता एक मुलगा श्रीकांत राणे याच्या पोटात अचानक वेदना होऊ लागल्या होत्या. दवाखान्यात केलेल्या तपासणीअंती श्रीकांत यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच चिंताग्रस्त बनले आहे.
सर्वांचा विरोध होता पण… किडनी देऊन पतीला वाचवणाऱ्या पत्नीनं सांगितली इमोशनल स्टोरी, Video
श्रीकांत यांचे वडील ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत होते. सध्या ते सेवानिवृत्त झालेत. तर त्यांच्यावर देखील चार वेगवेगळ्या शस्त्रक्रीया करण्यात आल्या असल्यामुळे ते घरीच असतात. तर श्रीकांत हे नांदगाव येथे महा-ई सेवा केंद्र चालवतात. त्यांची दोन वर्षाची मुलगी, पत्नी, आई आणि वडिलांचा औषधोपचार या केंद्रातून मिळणार्या तुटपुंज्या कमाईवरच अवलंबून आहे. दरम्यान श्रीकांत हे निकामी किडन्यांसह जास्त काळ जगू शकत नाहीत. त्यामुळे स्वतः अशिक्षित असलेल्या नकुबाई यांनीच पुढाकार घेऊन एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी आपल्या मुलाला जीवदान देण्यासाठी स्वतःची एक किडनी देण्याची तयारी दर्शविली. योगायोगाने त्यांची किडनी श्रीकांत यांना प्रत्यारोपण करण्यास समरूप होणार असल्याचे देखील डाॅक्टरांनी सांगितले. भलामोठा खर्च येणार आता नकुबाई यांच्या किडनीने श्रीकांत यांना पुढील आयुष्य जगता येणार आहे. असे जरी असले तरी प्रत्यारोपणासाठी नऊ लाख रुपयांचा भलामोठा खर्च येणार आहे. हा एवढा पैसा कसा उभा करायचा हा एकच प्रश्न राणे कुटुंबियांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे. याआधीच शक्य तितक्या घरातील गोष्टी विकून, इतरांकडून उसणे पैसे जमा करून श्रीकांत यांच्या उपचारावर तीन लाख रुपयांपर्यंत खर्च कुटुंबाने केलेला आहे. पण प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च जमा करण्यासाठी देखील सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले.
बहिणीची माया! जीवाची पर्वा न करता किडनी देऊन वाचवला भावाचा जीव, पाहा Video
दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन श्रीकांत याची शस्त्रक्रिया लवकरच खासगी दवाखान्यात होणार आहे. खरंतर श्रीकांत यांच्या समोर उभा असणारा हा शस्त्रक्रियेचा खर्च इतका मोठा आहे की तो जमवणे शक्य होईल की नाही, हीच शंका श्रीकांत यांनी बोलून दाखवली. दरम्यान या शस्त्रक्रियेसाठी काही सामाजिक संस्था देखील मदत करण्यास सरसावल्या आहेत. पण त्यांना एकूणच शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर लागणाऱ्या औषोधोपचार आणि सर्व गोष्टींसाठीची चिंता आहे. त्यामुळे आईच्या प्रयत्नांना यश मिळवून देण्यासाठी समाजातील दानशूर मंडळींनी अर्थिक मदत करण्याचे आवाहन श्रीकांत यांच्याकडून करण्यात आले आहे. मदतीसाठी संपर्क : श्रीकांत राणे - 091584 24210