नाशिक, 01 जानेवारी : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमधील बहिण-भावाच्या प्रेमाचं उदाहरण नाशिकमध्ये समोर आलंय. तस्लिमा शेख या बहिणीने आपल्या जीवाची पर्वा न करता भाऊ असिफला मरणाच्या दारातून वाचवण्यासाठी स्वतःची किडनी दिली आहे. दोन्ही किडनी निकामी झालेल्या भावाला किडनी देऊन बहिणीने आपल्या भावाला नव्या आयुष्याची भेट दिल्यामुळे नाशिक मध्ये भावा बहिणीच्या प्रेमाचं सर्वांकडून कौतुक होत आहे. … आणि किडनी निकामी झाली नाशिकच्या वडाळा परिसरात राहणाऱ्या असिफ पठाण यांना काही दिवसांपूर्वी त्रास जाणवू लागला. त्यांना तात्काळ शहरातील वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी विविध चाचण्या केल्यानंतर किडनी निकामी झाल्याचं समजलं. त्यानंतर काही काळ उपचार सुरू ठेवले मात्र जास्त दिवस असिफ किडनी शिवाय राहू शकणार नाही असं नातेवाईकांना डॉक्टरांनी सांगितलं. या अवघड परिस्थितीमध्ये किडनी कोण देणार? हा मोठा प्रश्न असिफच्या परीवारासमोर उभा होता.
संकट समयी बहीण समोर आली जेव्हा आपल्यावर एखाद संकट येत तेव्हा सर्व नाती दूर होतात. असंच असिफच्या बाबतीतही घडलं सर्व नातेगोते दिसेनासे झाले. संपूर्ण परिवार चिंता ग्रस्त झाला होता. संकट समयी असिफची मोठी बहीण तस्लिमा समोर आली आणि माझी किडनी माझ्या भावाला देऊन त्याचा जीव वाचवा म्हणून डॉक्टरांना विनंती केली. मात्र, घरच्या परिवाराने तिच्या निर्णयाला विरोध केला. तुझी लहान मुलं आहेत. तू उगाच तुझा जीव धोक्यात घालवू नको पण भावाची स्थिती तिला बघवत नव्हती. ती म्हटली मला सद्या फक्त माझा भाऊ दिसत आहे आणि त्याला मी वाचवण्यासाठी काहीही करेल बहिणीची भावा प्रती ओढ बघता घरातील इतर सदस्यांनी ही होकार दिला. डॉ. अनिरुद्ध ढोकरे आणि श्याम पगार यांच्या टीमने वोक्हार्ट हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. तस्लिमाने आपल्या भावाला किडनी दिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आनंद अश्रू मावत नव्हते आणि भाऊ असिफसह सर्वच नातेवाईक भाऊक झाले. आजच्या घडीला दोघ ही भाऊ बहीण आनंदात आहेत.
Video : नाशिककरांसाठी 2023 ठरणार का लकी? रोजगार, पाऊस, पीकपाण्याबद्दल ज्योतिषांनी वर्तवलं भविष्य
अशी बहीण सर्वांनाच मिळो माझ्या बहिणीने जे माझ्यासाठी केलं आहे. ते मी कधीच विसरू शकत नाही. तिने घेतलेल्या निर्णयाचे मी शब्दात वर्णन करू शकत नाही. माझी बहिण माझ्यासाठी जीव की प्राण आहे. सर्व दूर गेले तेव्हा माझी बहिण माझ्यासाठी धावून आली. तिने तिच्या जीवाची पर्वा केली नाही. तिचा निर्णय हा आमच्यासाठी धक्काच होता. पण मला असं वाटत की माझ्या बहिणीचा सारखी बहीण सर्वांना मिळो,अशी प्रतिक्रिया असिफ पठाण यांनी दिली आहे. नात जपावं हीच माझी इच्छा जन्म झाला म्हणजे मृत्यू येणारच आहे. त्यामुळे त्याचा फार काही विचार करू नका नाती जपा,नातीच आपल्याला शेवटपर्यंत कामी येतात. माझ्या भावाला मी जिवदान दिलं हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यामुळे प्रत्येक बहिणीने नात जपावं हीच माझी इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया तस्लिमा शेख यांनी दिली.