कोल्हापूर, 24 सप्टेंबर : मागच्या दोन दिवसांपूर्वी एनआयए आणि एटीएसकडून देशभरात छापे टाकण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही एनआयए आणि एटीएसकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये पुणे, नाशिक, मुंबई, कोल्हापूर यासह अन्य जिल्ह्यात छापे टाकण्यात आले. यातील कोल्हापूरमध्ये छापा टाकून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा हस्तक मौला नबीसाब मुल्ला (सिरत मोहल्ला, सुभाषनगर) याला पकडण्यात आले. दरम्यान मौला मुल्लाचे क्राईम रेकॉर्ड खराब असल्याने याच्या कारनाम्याची कोल्हापूर पोलिस दलामार्फत चौकशी सुरू आहे. संशयिताच्या संपर्कातील दहा ते बारा स्थानिक साथीदार पोलिसांच्या रडारवर असल्याचे कोल्हापूर पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.
बलकवडे म्हणाले, टेरर फंडिंगप्रकरणी संशयाच्या भोवर्यात सापडलेल्या ‘पीएफआय’चा स्थानिक पदाधिकारी मौला मुल्लाच्या वर्षभरातील हालचाली संशयास्पद होत्या. राजारामपुरी पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवले होते. गतवर्षी दि. 6 डिसेंबर 2021 मध्ये विक्रमनगरमध्ये सार्वजनिक ठिकाणी वादग्रस्त डिजिटल फलक लावून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. चौकशीत त्याचे नाव निष्पन्न होताच गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली होती.
हे ही वाचा : चोर नग्न अवस्थेत अंगाला तेल लावून रस्त्यावर फिरायचा, मुंबई पोलिसांनी ठेचल्या नांग्या
राजारामपुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे संशयित मौला मुल्ला ‘एनआयए’-‘एटीएस’च्या जाळ्याला लागला आहे. डिसेंबरनंतर त्याने काही करामती केल्या आहेत का, याचीही सखोल चौकशी सुरू आहे. संशयितांच्या सतत संपर्कात असलेल्या दहा ते बारा साथीदारांची नावेही चौकशीतून पुढे आली आहेत. त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली आहे. शांतता-सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
संशयित मुल्लासह त्याच्या साथीदारांकडून समाजविघातक कृत्ये घडली असल्यास नागरिकांनी त्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालय अथवा राजारामपुरी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकार्यांना द्यावी. संबंधितांच्या नावाबाबत गोपनीयता पाळण्यात येईल, असेही बलकवडे यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : NIA चा PFI वर ‘सर्जिकल स्ट्राईक’, प्रकाश आंबेडकर म्हणतात पुरावे द्या, अन्यथा…
विक्रमनगर येथील वादग्रस्त पोस्टरप्रकरणी राजारामपुरीचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी संशयित मौला मुल्लाला अटक करून चौकशीसाठी उचगाव येथील मणेर मळ्यात नेले होते. मौलाच्या वडिलांकडून माहिती घेत असताना संशयिताने पोलिस वाहनावर स्वत:चे डोके आपटून घेत आरडाओरड केली. त्यामुळे त्याच्याशी संबंधित असलेल्या दोन-अडीचशेवर तरुणांनी गर्दी करून पोलिस अधिकार्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.