कोल्हापूर, 30 ऑक्टोबर : दलित समाजातील तरुणांच्या अंत्यविधीला काही लोकांनी विरोध केल्यामुळे हलकर्णी (ता. चंदगड) गावात काल (दि.29) शनिवारी दिवसभर तणावपूर्ण वातावरण झाले होते. तहसीलदार व पोलिस निरीक्षकांनी समजूत काढल्यानंतर तब्बल आठ तासानंतर रात्री उशिरा मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनंत प्रभू कांबळे (वय 32) रा. हलकर्णी यांचे शनिवारी हदयविकाराने निधन झाले.
त्यानंतर नेहमीप्रमाणे गावच्या जवळील स्मशान भूमीत दफनविधीसाठी खोदाई करण्यासाठी गेलेल्या लोकांना काही ग्रामस्थांनी विरोध केला. ही आमची जागा असून यापुढे तुम्ही इकडे यायचे नाही, असे त्या ग्रामस्थांनी म्हटल्यावर वाद झाला. त्यानंतर दलित समाजातील लोकांनी येऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडला. प्रशासनाविरोधात बोंबमारो आंदोलन केले.
हे ही वाचा : ‘खड्ड्याकडे दुर्लक्ष का केलं?’; कोल्हापुरात अपघातात आईचा मृत्यू झाल्याने मुलावरच गुन्हा दाखल
त्यानंतर पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी त्या जागेविषयी वाद असल्याने तुमच्या खासगी जागेत यावेळी अंत्यविधी करा. व त्यानंतर यावर तोडगा काढू, असे सांगितल्यावर दलित समाजातील लोक तयार झाले. पण त्यातील काही लोकांनी प्रत्येकवेळी प्रशासन असेच सांगते व वेळ मारुन नेते त्यामुळे याप्रश्नाचा तोडगा काढल्याशिवाय अंत्यविधी करणार नाही म्हणत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले.
पुन्हा प्रकरण चिघाळल्यामुळे पोलिस निरीक्षक घोळवे यांनी कठोर भूमिका घेत कायदा व सुव्यवस्था बिघडविल्यास मला नाईलाजाने कारवाई करावी लागेल, असे सांगितल्यावर सरपंच राहूल गावडा, उपसरपंच रमेश सुतार, माजी सरपंच एकनाथ कांबळे, पोलिस पाटील अंकुश पाटील यांच्या पुढाकाराने दलित समाजातील लोकांनी नमती भूमिका घेत स्वमालकीच्या जागेत अंत्यविधी केला.
तहसीलदार हात बांधून गप्प
गावातील वातावरण तणावपूर्ण बनल्याने तहसीलदार विनोद रणवरे यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मूळ जागा मालक काही बोलत नसताना जवळच्या लोकांचे ऐकून तुम्ही त्यांना सांगायचे सोडून आम्हालाच का सा़ंगता? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केल्याने तहसीलदार हतबलच झाले होते.
हे ही वाचा : हातभट्टीवाल्यांची दादागिरी वाढली, महिला पोलिसावर चाकूने हल्ला, कोल्हापुरातल्या घटनेने खळबळ
जागेचे पुरावे मागताच ते निरुत्तर
कित्येक वर्षांपासून हलकर्णी गावाजवळील स्मशानभूमीत अंत्यविधी करत आहेत. पण गेल्या वर्षीपासून याविषयी वाद निर्माण झाला आहे. शनिवारीही वाद निर्माण झाल्याने संबंधित जागेजवळील लोकांना ती जागा तुमची असेल तर त्याचे पुरावे आणा, असे तहसीलदार रणवरे व पोलिस निरीक्षक घोळवे यांनी सुनावताच ते निरुत्तर झाले. त्यानंतरही प्रशासनाने कठोर भूमिका न घेताच दलित समाजातील लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.