ज्ञानेश्वर साळोखे, 28 ऑक्टोबर : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही काळापासून अवैध धंदाच्या प्रमाणात वाढ झाल्याने पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. खून, मारामाऱ्या, चोऱ्या यासारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे. याचबरोबर जुगार अड्डे, अवैध दारू गावठी भट्ट्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान यावर पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या माणगाववाडी येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्हयातील माणगांववाडी ( ता. हातकणंगले ) येथे चोरून अवैध रित्या गावठी हातभट्टीची दारू बनवली जायची. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पथकासह गावठी हातभट्टी दारुअड्डयावर छापा टाकण्यासाठी गेले होते. यावेळी स्थानीक गुन्हे अन्वेषण पथकावर अवैधरित्या दारू उत्पादन करणाऱ्या 10 ते 15 अनोळखी इसमांनी पोलीसांवर हल्लाबोल केला.
हे ही वाचा : जयप्रभा स्टुडिओ कोणाच्या घशात? स्टुडिओ वाचवण्यासाठी आंदोलकांचा पेटवून घेण्याचा प्रयत्न
यामध्ये काठी, दगड व चाकूचा सर्रास वापर करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि.26) रोजी घडली. यामध्ये एका महीला पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी महीला अधिकारी अंकीता पाटील असे त्यांचे नाव आहे. याबाबतची फिर्याद राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम अधिकारी शितल चंद्रकांत शिंदे यांनी हातकणंगले पोलिसांत दिली आहे.
दरम्यान गुरुवारी दुसऱ्या दिवशी स्थानीक गुन्हे अन्वेषणचे पथक व हातकणंगले स्थानिक पोलीसांनी माणगांववाडीमध्ये ठिय्या मांडून अनेक दारू अड्डे उध्वस्त केले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू काढण्यासाठी लागणारे रसायन, बॅरल व गूळ आदी मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.
हे ही वाचा : रस्त्यावर किडेच किडे, बाईक स्लिप झाली आणि कारच्या चाकाखालीच आला तरुण, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO
चार ठिकाणी टाकलेल्या छाप्यात सुमारे दोन लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. यामध्ये लोखंडी बॅरेल, सिंटेक्स टाक्या, पत्र्याचे डबे यामध्ये केलेल्या रसायन साठयाचा समावेश आहे. या कारवाईत संशयित इसमांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.