साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 14 जून : राजर्षी शाहू महाराजांची नगरी म्हणूनच कोल्हापूरची ओळख आहे. या शाहू नगरीनं नेहमीच सामाजिक सलोखा जोपासला आहे. मात्र, काही समाज कंटकांमुळे या ठिकाणच्या या ओळखीला तडा जाताना दिसला. मात्र, शाहू विचारांचा वारसा जपत सामाजिक सलोख्याची शिकवण देणारी एक रिक्षा कोल्हापुरातील रस्त्यांवरून धावताना दिसतेय. मंजूर बागवान हे आपल्या रिक्षाच्या माध्यमातून कोल्हापुरातील प्रवाशांच्या मनात हिंदू-मुस्लिम ऐक्य जपण्याचा प्रयत्न करत आहेत. शिव-शाहूंचा वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न मंजूर बागवान हे गेली 16 वर्षे रिक्षाचालक म्हणून काम करत आहेत. कोल्हापुरात शनिवार पेठेत महानगरपालिका इमारती जवळ ते राहतात. त्यांच्या रिक्षाची विशेषता म्हणजे त्यांनी त्यांच्या रिक्षाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या रिक्षाच्या आतमध्ये स्टिअरिंग हॅण्डलवरील डॅशबोर्डवर छत्रपती शिवरायांची मूर्ती स्थापित केली आहे. तर रिक्षाच्या बाहेरच्या बाजूला हेडलाईटच्यावर शाहू महाराजांची मूर्ती बसवली आहे.
काय आहे उद्देश? मंजूर बागवान हे रिक्षा चालक म्हणून काम करतात. ते स्वतः जरी मुस्लिम असले तरी शिवशाहूंच्या विचारांबद्दल त्यांना मनापासून अभिमान आहे. कोल्हापूर हे राजर्षी शाहू महाराजांमुळेच घडले आहे. या गोष्टीचा त्यांना सार्थ अभिमान आहे आणि हीच गोष्ट इतर जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अशा प्रकारे शिवराय आणि शाहू राजांच्या मूर्ती रिक्षामध्ये बसवल्या आहेत. रिक्षाही आहे विशेष मंजूर बागवान यांच्या रिक्षामध्ये या शिवशाहूंच्या मूर्ती व्यतिरिक्त प्रवाशांच्या सोयी सुविधांचे देखील विशेष काळजी घेण्यात आली आहे. रिक्षामध्ये त्यांनी प्रवाशांसाठी फॅनची सोय, आग विझविण्याचे यंत्र, पिण्याचे पाणी ठेवले आहे. तसेच आतमध्ये गाणी आणि एलईडी लाइट्स छोटीशी स्क्रीन अशा प्रकारच्या सुविधा बसवून घेतल्या आहेत. खरी सावित्री : लव्ह मॅरेज केलं अन् असं काही घडलं की सगळं आयुष्यच पालटून गेलं! पाहा Video एकोपा जपण्याचे आवाहन मंजूर बागवान हे गेली कित्येक वर्षे रिक्षा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना कोल्हापूरचा कानाकोपरा माहिती आहे. त्यामुळेच, ‘कोल्हापूर हे सामाजिक एकोपा जपणारे शहर आहे. इथे प्रत्येक सण हा हिंदू मुस्लिम बांधव एकत्रितच साजरे करतात. काही ठराविक घटकांमुळे कोल्हापुरातील एकोपा कमी होऊ न देण्यासाठी सर्व कोल्हापूरवासियांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन मंजूर बागवान यांनी कोल्हापूरकरांना केले आहे.