साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी कोल्हापूर, 03 जून : वटपौर्णिमेला प्रत्येक पतिव्रता वडाच्या झाडाला फेऱ्या मारून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते. मात्र, सध्याच्या युगातील खरी सावित्री ठरत असलेली कोल्हापुरातील एक पत्नी आपल्या पतीचे आयुष्य सुखकर होण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत आहे. तिच्या प्रयत्नांतूनच तिने अपघातामुळे अपंगत्व आलेल्या आपल्या पतीबरोबरचा संसार सुखाचा बनवलाय. 2015 साली संसार सुरू झाला कोल्हापुरातील उचगाव परिसरात राहणाऱ्या पांडव दांपत्याची ही कहाणी आहे. विलास आणि माधवी यांची विद्यालयातील मैत्री प्रेमात बदलली त्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि 2015 साली त्यांचा संसार सुरू झाला. मात्र देवाच्या मनात काही वेगळेच होते त्यामुळेच लग्नानंतर साधारण पंधरा-वीस दिवसानंतरच विलास यांचा एक अपघात झाला. त्यांच्या अंगावर एक भले मोठे झाड पडल्यामुळे त्यांच्या मणक्याला मार लागला. तेव्हापासून विलास यांचे शरीर कमरेपासून खाली लुळे पडले आहे.
लग्नानंतर अगदी काहीच दिवस झालेले आणि अशातच घरातील कर्ता पुरुष असणाऱ्या आपल्या पतीला अशा प्रकारे अपंगत्व आल्यामुळे माधवी या पूरत्या खचून गेल्या होत्या. नातेवाईकांनी साथ सोडल्यामुळे हे दाम्पत्य एकटे पडले होते. मात्र मित्रपरिवार आणि जोडलेल्या माणसांनी धीर दिला आणि पुन्हा नव्याने आयुष्य सुरु करण्यासाठी मदत देखील केली. त्यामुळेच आज काही वर्षांनी विलास आणि माधवी यांचा त्यांच्या एक वर्षाच्या गोंडस मुलासह सुखी संसार सुरू आहे. त्यानंतर आयुष्यात पुढे दिसत होता अंधार विलास आणि माधवी यांचं लग्न झालं आणि लग्नानंतर अगदी काहीच दिवसांनी हा अपघात झाला. त्यामुळे विलास यांच्यावर जवळपास काही महिने दवाखान्यात उपचार सुरू होते. जेव्हा आम्हाला समजलं की, मी यापुढे चालू शकणार नाही. तेव्हा मला फार मोठा धक्का बसला होता. पुढचं सगळं आयुष्य अंधारमय बनणार असं वाटत होतं. काय होणार? कसं होणार? काहीच सुचत नव्हतं, अशा भावना विलास यांनी व्यक्त केल्या आहेत.
Vat Purnima 2023 : कुटुंबावर आलं संकट, पण ती डगमगली नाही, रिक्षा चालवून सांभाळला संसार!
घर, पती आणि मुलाला सांभाळत माधवी यांचा सुखी संसार माधवी आणि विलास हे दोघेही लग्नापूर्वी नोकरी करत होते. तर लग्नानंतर लगेचच झालेल्या अपघातामुळे विलास यांची नोकरी सुटली. पण काही वर्षांनी मी पुन्हा नोकरी सुरू केली आणि घर संसाराचा गाडा चालवला. वेळ प्रसंगी स्वतःचे दागिने देखील विकले आहेत. तर विलास यांना ब्रेन वॉश करत त्यांना देखील पुन्हा नोकरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आम्ही आता आनंदी जीवन जगत आहोत, असे माधवी यांनी सांगितले आहे. सध्या विलास हे घरातूनच एका हॉस्पिटलसाठी काम करतात. तर माधवी या लॅब टेक्निशियन म्हणून काम करतात. कोल्हापुरच्या उचगाव येथील एका भाड्याच्या घरात ते आपल्या मुलासोबत आनंदी जीवन जगत आहेत. विलास आणि माधवी यांच्या या अतूट प्रेमामुळे नक्कीच इतरांना प्रोत्साहन मिळत आहे.