कोल्हापूर, 12 जानेवारी : माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर काल (दि.11) ईडीकडून छापेमारी करण्यात आली. तब्बल 12 तास मुश्रीफांच्या घरी छापेमारी सुरू होती. सकाळी सात वाजता सुरू झालेला तपास सायंकाळी सात वाजता संपला. दरम्यान ईडीने केलेल्या कारवाईत काहीच निष्पण्ण न झाल्याचे दिसून आल्याने उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती दिली आहे. सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. यानंतर ते दुसऱ्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.
किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत माहिती दिली की, कोल्हापूरच्या महालक्ष्मीने मला आशीर्वाद दिला आणि हसन मुश्रीफांचे काऊंटडाऊन सुरू झाले. आज ट्विट करत म्हटलं की, मी लवकरचं कोल्हापूरला येणार आहे. आई महालक्ष्मीचे आशीर्वाद दर्शन घेण्यासाठी मी पुढील आठवड्यात कोल्हापूर जाणार आहे. किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आले होते. यानंतर ते दुसऱ्यांदा येत आहेत.
हे ही वाचा : बाळासाहेबांच्या तैलचित्रावर ठाकरेंची शिवसेना नाराज, शिंदेंचा पलटवार, वाद पेटणार!
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी किरीट सोमय्या यांनी 2023 मध्ये कोणाकोणाचे घोटाळे उघडकीस आणणार याची यादी आपल्या ट्विटरवर शेअर केली होती. काल (दि.११) हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर ईडीकडून सकाळी अचानक छापा टाकला. यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले होते की, हसन मुश्रीफांनी घोटाळ्याचे 158 कोटी रूपये स्वत:च्या व नातेवाईकांच्या नावाने घेतले.
कोलकात्याच्या बोगस कंपन्यांमधून पैसे आपल्या साखर कारखान्याकडे वळविले; पण कोल्हापूरच्या महालक्ष्मीने मला आशीर्वाद दिला आणि हसन मुश्रीफांचे काऊंटडाऊन सुरू झाले. आता सर्व घोटाळ्यांचा हिशोब घेऊनच राहणार. त्यांच्यावर फक्त आरोप केलेले नाहीत तर पुरावे दिले आहेत.
हे ही वाचा : तब्बल 12 तासांनी मुश्रीफांची चौकशी थांबली, ईडीच्या तपासात काय समोर आलं?
आता सगळ्याचा हिशोब घेणार
उद्धव ठाकरेंनी प्रकरण दाबले होते. 28 सप्टेंबरला कोल्हापूरला घोटाळे काढण्यासाठी जात होतो; पण मुश्रीफांनी जाऊ दिले नाही. महालक्ष्मीचे दर्शन घेऊ दिले नाही. आता सगळ्याचा हिशोब घेणार. पैसे घेताना, भ्रष्टाचार करताना धर्म आठवत नव्हता का? भ्रष्टाचार करणारे माफिया मंत्री असतात, त्यांना जात-धर्म नसतो, तो घोटाळेबाज मंत्री असतो त्यांच्यावर कारवाई होणारच, असे सोमय्या यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Case ED raids, Kirit Somaiya, Kolhapur, NCP