कोल्हापूर, 30 नोव्हेंबर : यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष, भंडाऱ्याची उधळण आणि अत्यंत भक्तिमय वातरवरण असा सगळा माहौल चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी कोल्हापुरात पाहायला मिळत असतो. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील खंडोबा मंदिरात एक विशेष सोहळा नुकताच पार पडला. तो म्हणजे हळदीचा हा हळदी समारंभ पाल येथील श्री खंडोबा आणि म्हाळसादेवी यांच्या विवाहाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कोल्हापुरातील या खंडोबा मंदिरात पार पडणारा हा हळदी सोहळा हे या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून पुढे पाच दिवस श्री खंडोबाचा षड् रात्रोत्सव म्हणजेच चंपाषष्ठीचा नवरात्रोत्सव सुरु होतो. त्याच मुहुर्तावर कोल्हापुरातील या खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीच्या पूर्वसंध्येला हा हळदीचा सोहळा पार पडत असतो. करवीर म्हणजेच कोल्हापूर हे एका अर्थाने म्हाळसा देवीचे माहेर मानले जाते. त्यामुळे नवरीकडची हळद म्हणून या हळदीला खंडेरायाच्या उपासकांमध्ये मोठे स्थान आहे, अशी माहिती मंदिर अभ्यासक ॲड. प्रसन्न मालेकर यांनी दिली.
Kolhapur : कसा असतो भुतांचा राजा वेताळाचा उत्सव? पाहा Video
या नवरात्रोत्सवात बसलेले देव उठवून त्यांना हळद चढवली जाते. सर्व मानकरी आणि भक्तांकडून देवाला ही हळद लावण्यात येते. त्यानंतर दुग्धाभिषेक घालून देवाची विधिवत पूजा बांधली जाते. यावेळी लावण्यात येणारी ही हळद म्हणजेच श्री खंडोबा व म्हाळसादेवी यांच्या पुढे पार पडणाऱ्या विवाह सोहळ्याची हळद असते. शिवरायांकडून इनाम म्हणून मंदिर व्यवस्थापनाची जबाबदारी करवीर संस्थानचा पाल येथील विवाह सोहळ्याशी संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीच चोपदार घराण्याकडे या देवालयाच्या जबाबदारीचा मान बक्षीस रूपाने दिल्याचे विजय खंडेराव चोपदार यांनी सांगितले. तर पंढरपूरकर घराण्याकडे या मंदिराच्या पूजेची जबाबदारी आहे. पाल येथे पार पडणाऱ्या श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या विवाहासाठी म्हाळसादेवीचे वऱ्हाड, घोडा, सासनकाठी, वाघे-मुरळी इत्यादिंसह हजर राहण्याची चोपदार यांची वंशपरपंरा आहे. तशी परंपरा इथे आजतागायत चालू आहे. तसेच त्या विवाह प्रसंगी कोल्हापूरच्या या चोपदार यांना प्रमुख मान असतो, असे राजेंद्र गणपती चोपदार यांनी सांगितले.
मार्गशीर्ष महिन्यात दर रविवारी भरते खंडोबा यात्रा, पाहा काय आहे अख्यायिका video
कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील हे खंडोबा मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील आहे. मंदिर परिसरात दगडी तटबंदी आणि दगडी चौकटीचे प्रवेशद्वार आहे. गाभाऱ्यात खंडोबा-म्हाळसा-बाणाईंचे मुखवटे आहेत. त्यांच्यामागे मोठी पिंड असून त्यात 2 शिवलिंग आहे. मंदिरामागे म्हसोबा मंदिर व पुढे 2 दीपमाळा आहेत. गाभाऱ्याच्या पश्चिमेकडील बाजूस भिंतीलगत श्री खंडोबाची अश्वारुढ अशी दगडी कोरीव काम केलेली मूर्ती आहे. सभा मंडपात गणपती, दत्त-पादुका, पांडुरंग-रुक्मिणी व हनुमानासह नंदी व कासव अशा दगडी मूर्ती आहेत. श्री खंडोबा मंदिरात हा धार्मिक हळदी सोहळा गेली कित्येक वर्षे तितक्याच आनंदाने आणि उत्साहात दरवर्षी साजरा होत आहे. आणि अशा प्रकारे पालच्या विवाहातील म्हाळसादेवीच्या हळदीचा मान कोल्हापूरकडे सोपवला गेला असल्यामुळे या हळदीला देखील विशेष महत्व प्राप्त झाले आहे.