कोल्हापूर, 29 नोव्हेंबर : वेताळ म्हणजे भुतांचा राजा.. अशीच एक व्याख्या आपल्याला माहीत आहे. पण कोल्हापुरात वेताळ हा एक महत्त्वाचा भाग आहे. कोल्हापुरातील शिवाजी पेठ परिसरात याच वेताळ देवाचे एक ठिकाण आहे. आणि दरवर्षी या वेताळ देवाचा उत्सव साजरा करण्याची परंपरा इथे वर्षानुवर्षे पार पाडली जात आहे. यावर्षी या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात आला.
दिवाळीनंतर येणाऱ्या अमावस्येला श्री वेताळ देवाचा कार्तिक उत्सव साजरा होतो. यानिमित्ताने परंपरे प्रमाणे श्री वेताळ देवाची आकर्षक पूजा बांधली जाते. सकाळपासून अभिषेक, पूजा असे दैनंदिन धार्मिक विधी होतात. त्यानंतर आंबील आणि भाजी भाकरीचा नैवेद्याचा विधी होतो. आरती नंतर सायंकाळी सात वाजता मंदिर आवारातून पालखीला सुरुवात होते. आणि पालखी परिक्रमा संपल्यावर महाप्रसादाचे वाटप होते.
कोल्हापूर अर्थात करवीर हे जसं श्री अंबाबाई देवीचे निवासस्थान आहे, त्या प्रमाणेच हे अनेक क्षेत्र देवतांचे देखील निवासस्थान आहे. त्यापैकीच एक कोल्हापुरातील स्थान म्हणजे शिवाजी पेठेतील वेताळ देवाचे क्षेत्र आहे. तामसी तत्वांच्या देवतांचा अधिष्ठाता असणाऱ्या वेताळ देवाची करवीर ही मनुष्य रूपातील जन्मभूमी मानली जाते. कालिका पुरणात आपल्याला याचा संदर्भ बघायला मिळतो. त्यामुळे वर्षातून एकदा कार्तिक आमावस्येच्या दिवशी त्याचाच एक भाग म्हणून हा वेताळ उत्सव साजरा केला जातो, असे मंदिर आणि मुर्ती अभ्यासक ॲड. प्रसन्न मालेकर यांनी सांगितले आहे.
मार्गशीर्ष महिन्यात दर रविवारी भरते खंडोबा यात्रा, पाहा काय आहे अख्यायिका video
वेताळ माळ परिसरात पूर्वी म्हणजे साधारण दीडशे-पावणे दोनशे वर्षांपूर्वी काहीच वस्ती नव्हती. कोल्हापूरच्या एका टोकाला हा परिसर होता. ज्यावेळी या माळावर वस्ती नव्हती, तेव्हा मुक्ताबाई राऊत यांनी या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली रोज पूजा करत असत. नंतर एकेक घरे आजूबाजूला व्हायला लागली. इथे नागरी वस्ती वाढली आणि हा परिसर मध्यवर्ती वस्तीमध्ये समाविष्ट झाला. पूर्वी जिथे दिवसाढवळ्या जायला भीती वाटायची त्या वेताळमाळ भोवती आता चौफेर वस्ती झाली आहे. वेताळ म्हणजे भुतांचा राजा असल्या दंतकथा केवळ चर्चेत उरल्या आहेत. पण या परिसरातल्या रहिवाशांची वेताळ देवाशी जुळलेली पारंपरिक नाळ आजही कायम आहे. त्यामुळे मोठ्या भक्तिभावाने इथे हा उत्सव साजरा होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
सामाजिक अस्मितेचे दर्शन
वेताळाची पालखी म्हणजे दिवाळी सारखेच वातावरण असते. फटाक्यांची आतषबाजीने पालखीचे स्वागत करण्यात येते. परिसरातल्या छोट्या-छोट्या गल्ल्या फुलांच्या पायघड्यांनी सजलेल्या असतात. दारात पालखीच्या मार्गावर मोठमोठ्या रांगोळ्यांची सजावट असते. वेताळाची पालखी प्रत्येक गल्लीत फिरत असते. हा सोहळा म्हणजे एक धार्मिक सोहळा असला, तरी त्यानिमित्ताने कोल्हापुरच्या पेठापेठातील सामाजिक अस्मितेचे दर्शन घडत असते.
Kolhapur : देशातील एकमेव मातृलिंग मंदिर, वर्षातून फक्त 3 वेळा उघडतात दरवाजे, Video
मुर्तीऐवजी फक्त दगडी शिळा
खरंतर वेताळमाळावर वेताळाची कोठेही मूर्ती नाही, केवळ प्रतीकात्मक दगडी शिळा आहेत. त्यावर छत नाही. पिंपळाच्या विशाल झाडाखाली या वेताळ देवाचे स्थान आहे. त्यावर शेंदरी रंगाचा मोठा थर होता. वेताळाची पूजाविधी करणाऱ्या राऊत परिवाराने यंदा रंगाचा थर काढला आहे. त्यामुळे इथून पुढे नैसर्गिक दगडी रुपातच वेताळ सर्वांना दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.