कोल्हापूर : देशात लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. भाजपाने आतापासूनच लोकसभेची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे होताना दिसत आहेत. पहिल्यांदा भाजपाच्या मिशन बारामती अंतर्गत अर्थमंत्री निर्मला सितारमण या बारामती दौऱ्यावर आल्या होत्या. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. 24 व 25 नोव्हेंबर रोजी ज्योतिरादित्य सिंधिया हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या दौऱ्यानिमित्त कोल्हापूर भाजपच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिंदेंचे मतदारसंघ रडारवर? भाजप हातकणंगले आणि कोल्हापूर या लोकसभेच्या मतदारसंघात कमळ फुलवण्याच्या तयारीत आहे. हे दोन्ही मतदार संघ शिवसेनेने जिंकत इतिहास रचला होता, मात्र बदलत्या सत्ता समीकरणात इथले खासदार शिंदे गटात गेले आहेत. भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी 45 जागां जिंकण्याचे लक्ष ठेवलं आहे. त्यामुळे सहाजिकच शिंदे गटाचे खासदार असलेले अनेक मतदारसंघ देखील भाजपाच्या रडारवर असण्याची शक्यात आहे. याच पार्श्वभूमीवर आता ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या कोल्हापूर दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. ‘असा’ असेल ज्योतिरादित्य सिंधिया यांचा दौरा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे 24 व 25 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सिंधिया यांच्या या दौऱ्यादरम्यान भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 : 15 वाजता सिंधिया यांचं विमानतळावर आगमन होणार आहे. सकाळी 11 वाजता ते शाहू महाराज स्मृतिस्थळ तसेच त्याठीकाणी सुरू असलेल्या विकासकामांना भेट देणार आहेत. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते दिनांक 25 नोव्हेंबर रोजी देखील जिल्ह्यात आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







