कोल्हापूर, 17 नोव्हेंबर : कोल्हापूर हे तांबड्या-पांढऱ्या रश्यासोबतच कोल्हापुरी गुळ हा सर्वत्र प्रसिद्ध आहे. बाजारात या गुळाला देखील विशेष मागणी असते. कोल्हापुरात पूर्वापार चालत आलेली गुऱ्हाळ घरांची परंपरा आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात गुऱ्हाळाचा हंगाम सुरू झाला आहे. कोल्हापूरी गुळासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रयाग चिखली या ठिकाणी गुऱ्हाळघरांची घरघर कानावर पडू लागली आहे. कसा बनवतात गूळ? या गुऱ्हाळ घरांवर शेतातून तोडून आणलेल्या ऊसाचा क्रशर मशिनच्या साहाय्याने रस काढण्यात येतो. याठिकाणी रस आणि उसाचे चिपाड वेगळे होतात. रस गाळल्यानंतर ओले चिपाड वाळविण्यासाठी तिथेच पसरून टाकण्यात येते. हे वाळलेले चिपाड गुळ बनविताना जळण पुन्हा वापरले जाते. क्रशर मशीनने तयार होणारा रस एका इलेक्र्टिक मोटरच्या साहाय्याने उचलून एका टाकीत नेला जातो. तिथून तो काहिलीत ओतला जातो. हा ऊसाचा रस जवळपास 2 तास तापविला जातो. जसं जशी त्याला उकळी फूटते, तस तसे त्यामध्ये मळी बाहेर पडण्यासाठी आवश्यक सामुग्री टाकण्यात येते. ही मळी एका मोठ्या झाऱ्याने बाजूला करून तो रस एका रोलिंग व्हीलच्या साहाय्याने फिरता ठेवला जातो. हा तयार झालेला गाढा रस एका ठराविक अवस्थेनंतर चुलीवरून बाजूला केली जातो. जवळच्या एका खड्ड्यात या काहिलीत तयार झालेले मिश्रण ओतले जाते. हे मिश्रण घट्ट होत आल्यावर वेगवेगळ्या आकारमानाच्या साच्यांमध्ये भरले जाते. हा तयार गुळ थंड होण्यासाठी ठेवण्यात येतो. थंड झाल्यानंतर आपल्याला नेहमी बाजारात दिसणारा गुळ मिळतो, असे चिखली येथील संग्राम गुऱ्हाळ घराचे मालक केवळसिंग रजपूत यांनी सांगितले.
गुऱ्हाळ करणारे कामगार कोण? वर्षानुवर्षे एकच टोळी एकाच गुऱ्हाळ घरावर काम करत असते. त्यातून गुऱ्हाळ घर मालक आणि कर्मचारी यांच्यात एक स्नेहाचे आणि आपुलकीचे नातेही तयार झालेले बघायला मिळते. गुऱ्हाळ घरावर काम करणाऱ्या टोळ्या या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून हंगामावेळी येत असतात. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, तसेच मराठवाडा, विदर्भ आणि कर्नाटकातून देखील या टोळ्या येत असतात. त्यांना वर्षभरासाठीची रक्कम एकदम देण्यात येत असते. त्यामुळे या ठिकाणी सर्वजण एकत्रपणे काम करत असतात असे रजपूत म्हणाले. स्ट्रीट फूडला गावरान तडका.. स्पेशल तवा टोस्टची कोल्हापुरात चर्चा! Video कसा सुरू होतो हंगाम? हंगाम सुरू होण्याआधी महिनाभर या गुऱ्हाळ घरांची तयारी करावी लागते. त्यात घाण्याची दुरूस्ती, कायलीची आणि चुलवानाची डागडुजी यांचा समावेश असतो. फडात आणि गुऱ्हाळात काम करणाऱ्या टोळ्या ठरलेल्या असतात. देखभाल दुरूस्तीचे काम झाले की अनेक गुऱ्हाळ मालक गूळ उत्पादनाला सुरूवात करतात. कांदा भजीला पर्याय असलेली कोल्हापुरी डिश तुम्ही खाल्लीय? पाहा Video गुऱ्हाळघरं नाहिशी होणार? नव्या पिढीने या व्यवसायाकडे फिरवलेली पाठ, उत्पादन खर्चाच्या तुलनेत गुळाला मिळणारा कमी दर आणि टोळ्यांकडून होत असलेली फसवणूक याला कंटाळून बऱ्याच मालकांकडून गुऱ्हाळघर बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे भविष्यात गुऱ्हाळघरे नाहीशी होतील की काय? असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे.