कोल्हापूर, 19 फेब्रुवारी : जेव्हा जेव्हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं तेव्हा तेव्हा भाजपला यश मिळालेलं आहे. असं सांगत आगामी निवडणुका भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याची घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर अमित शहा भाजप विजय संकल्प सभेस संबोधित करत आहेत. काय म्हणाले अमित शाह? देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2019 विधानसभा निवडणुका लढवण्यात आल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांना संख्या जास्त दिसताच. शरद पवार यांच्या चरणी सत्तेसाठी विलिन झाले. आम्हांला सत्तेचा मोह नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करण्याच काम भाजपने केलं आहे. यावेळी बहुमत नव्हे तर 48 च्या 48 जागा जिंकायच्या आहेत, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. वाचा - शिवजयंतीनिमित्त मनसेने पुन्हा दाखवली ब्ल्यू प्रिंट, राज ठाकरेंच्या आवाजात विकासाचा Video केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्नी सोनल शाह यांच्यासह कुंकूमार्चन पूजा केली. तसेच ‘आई अंबाबाई, सर्वांना सुख, समृध्दी दे!’ अशी प्रार्थना केली. यावेळी मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, समरजितसिंह घाटगे, महेश जाधव, राहुल चिकोडे, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते. दरम्यान गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्री अंबाबाईची प्रतिमा देवून पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







