कोल्हापूर, 18 नोव्हेंबर : क्रिकेटवेड्या भारत देशात फुटबॉल वेडे शहर अशी कोल्हापूर ची एक वेगळी ओळख आहे. बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कोल्हापूरच्या फुटबॉलबद्दल चर्चा असते. कोल्हापूरचे तरुण हे आपल्या भारतीय खेळाडूंबरोबरच बाहेरच्या देशातील खेळाडूंचे देखील समर्थक आहेत. आपल्या स्टार खेळाडूप्रती असणारे प्रेम दाखवण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारे समर्थन करत असतात. 20 नोव्हेंबरपासून फिफा वर्ल्ड कप कतारमध्ये सुरू होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या देशांच्या संघांचे समर्थन करणाऱ्या गोष्टी बघायला मिळत आहेत. केरळ, बंगाल आणि गोवा या राज्यांप्रमाणेच कोल्हापुरात देखील फुटबॉलची प्रचंड क्रेझ बघायला मिळते. इथे तालीम आणि पेठांमध्ये अनेक फुटबॉल वेडे तरुण आहेत. फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जशी चुरस असते, अगदी तशीच येथील पेठांमध्ये देखील एक वेगळीच चुरस असते. लिओनेल मेसी, क्रिस्टियानो रोनाल्डो अशा दिग्गज खेळाडूंचा प्रचंड मोठा चाहता वर्ग कोल्हापुरात आहे.
फिफाच्या वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात फुटबॉलच्या दिग्गज खेळाडूंचे कट आउट्स लावण्यात आलेले आहेत. कुठे वीस फूट, कुठे पंधरा फूट, तर कुठे पस्तीस फूट अशा प्रकारचे उंचच उंच कट आउट्स लावण्यात आले आहेत. इतकेच नाही तर गल्लीमधील रस्ते देखील वर्ल्ड कपमध्ये सामील झालेल्या देशांच्या झेंड्यांनी सजवण्यात आले आहेत. घरांच्या बालकणीवर खेळाडूंचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूर शहरातील गल्ल्या, पेठा आणि चौक येथील वातावरण हे फुटबॉलमय बनले आहे. कोल्हापुरात कुठे काय लावण्यात आले आहे? 1) कोल्हापुरातील शिवाजी पेठेत खंडोबा तालीम परिसर हा सॉकर स्ट्रीट म्हणून ओळखला जातो. मागच्याच वर्षी या परिसरात वेगवेगळ्या खेळाडूंची चित्रे घरांच्या भिंतीवर रंगवण्यात आली आहेत. त्याचबरोबर अर्जेंटिना संघाला समर्थन देणारा मोठी कापडी पताका रस्त्याच्या मधोमध वरती लावण्यात आली आहे. 2) नाईट कट्टा मंडळाजवळील गल्लीत वेगवेगळ्या देशांचे झेंडे पताका स्वरूपात लटकवण्यात आलेले आहेत. यामध्ये फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये असणाऱ्या देशांचे झेंडे यामध्ये समाविष्ट आहेत. 3) सरदार तालीम परिसरात नेयमार जुनिअर फॅन्स क्लब यांच्या वतीने नेमार जूनियर खेळाडूचा जवळपास 20 ते 25 फूट मोठा बॅनर एका इमारतीवर लावलेला आहे. 4) मंगळवार पेठेतील गुलाब गल्लीमध्ये लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या शेवटच्या वर्ल्ड कप साठी त्या खेळाडूंच्या सन्मानात त्यांचे फोटो असलेले पताके त्याचबरोबर त्यांच्या संघाचे झेंडे पताका स्वरूपात लावण्यात आले आहेत. 5) रंकाळा टॉवर परिसरात रंकाळा चौपाटी उद्यानाच्या कमानी शेजारी ब्राझील फॅन्सच्या वतीने नेयमार जुनिअर या खेळाडूचा अंदाजे 18 ते 20 फुटांचा फ्लेक्स लावण्यात आला आहे. 6) पाटाकडील तालीम मंडळाच्या गल्लीमध्ये ब्राझीलचा झेंडा हा पताका स्वरुपात अडकवण्यात आला आहे. तर मंडळाच्या शेजारील घराच्या बाल्कनीबाहेर ब्राझील संघातील खेळाडूंचे कट आउट्स लावले आहेत. 7) आझाद चौकात लिओनेल मेस्सीचा जवळपास 25 फूट उंच क्यू आउट मेस्सी समर्थकांच्या वतीने उभा करण्यात आला आहे. 9) सायबर कॉलेजच्या चौकात क्रिस्टियानो रोनाल्डो खेळाडूचा 35 फुटांचा उंच कट आउट लावण्यात आला आहे. कोल्हापुरातील कट्टर क्रिस्टियानो समर्थक या ग्रुपच्या वतीने हा महाराष्ट्रातील सर्वात उंच कट आउट लावण्यात आल्याचे या ग्रुपचे सदस्य विराज पोतदार यांनी सांगितले.
याबरोबरच अजून बऱ्याच ठिकाणी फुटबॉल प्रेमी आपल्याला बघायला मिळतात. सगळीकडे या वर्ल्ड कपच्या निमित्ताने फुटबॉलमय वातावरण सगळीकडे बनले आहे. या फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये भारताचा संघ नाही सामील होऊ शकला. त्यामुळे आपल्या देशावरचे प्रेम व्यक्त करता येत नसल्याची खंत आणि नाराजी देखील कोल्हापुरातील तरुणांनी व्यक्त केली.