साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 01 मार्च : वृद्धाश्रमातील वृद्ध हे एकतर त्यांच्या आयुष्यातील सुख-दुःखाच्या गोष्टी आठवत असतात. नाहीतर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर वृद्धाश्रमात का यावे लागले याचा विचार करत बसतात. पण कोल्हापूर च्या एका वृद्धाश्रमात एका वृद्ध जोडप्याने आपली प्रेमकथा जगलीच नाहीय, तर लग्न करून आपल्या प्रेमाला मूर्तरूप देखील दिले आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे या दांपत्याचा नुकत्याच प्रेमविवाह संपन्न झाला. घोसरवाडच्या जानकी वृद्धाश्रमातील 70 वर्षीय अनुसया शिंदे आणि 75 वर्षीय बाबुराव पाटील हे समदु:खी वृद्ध पहिले एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि आता ते एकमेकांच्या सरत्या आयुष्यातील जोडीदार बनले आहेत. या वृद्ध जोडप्याने केलेल्या वयाच्या सत्तरीतील हा अनोखा प्रेमविवाह मात्र सर्वत्र कुतूहलाचा विषय बनला आहे.
Love Story : वर्गात झाली भेट, 10 वर्ष केली प्रतीक्षा! इतरांच्या आयुष्यात रंग भरणारं अंध जोडपं, Video
या दाम्पत्यातील अनुसया या मूळच्या पुण्यातील वाघोली येथील आहेत. तर बाबुराव हे शिरोळ तालुक्यातीलच शिवनाकवाडी येथील आहेत. या दोघांच्याही साथीदारांचे देहावसान झाले आहे. दोघे गेली जवळपास 2 वर्षे आपला आला दिवस ढकलत जगत होते. कसे जडले प्रेम? वृद्धाश्रमातील इतरांप्रमाणे घरच्यांनी वाऱ्यावर सोडलेले हे दोघेही शरीराने स्वावलंबी असले तरी मानसिकदृष्ट्या खचलेले होते. त्यातच दोघे एकमेकांना आयुष्यातील आलेल्या अनेक संकटांबद्दल सांगून मन मोकळे करू लागले. यातूनच बाबुराव यांना अनुसया आवडू लागल्या. दोघांनी लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. मग कायदेशीर रित्या या दोघांचा विधिवत विवाह वृद्धाश्रम चालक आणि गावकऱ्यांनी लावून दिला. मी खूप आनंदी इथे जानकी वृद्धाश्रमात आल्यापासून माझ्या मनाला एकटेपणाची खंत वाटत होती. पण अनुसया बरोबर लग्न झाल्यानंतर आता मी खूप आनंदी असल्याचे मत बाबुराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.
निर्णय हा योग्यच बाबुराव यांनी मला विचारल्यानंतर मी खरंतर विचार करून उत्तर द्यायला 8 दिवसांचा कालावधी घेतला. पण शेवटी माझा लग्नाला हो म्हणण्याचा निर्णय हा योग्यच होता असं मला आता वाटत आसल्याच्या भावना अनुसया शिंदे यांनी बोलून दाखवल्या आहेत. आम्ही विधिवत लग्न लावून दिले जेव्हा आम्हाला बाबुराव आणि अनुसया यांच्या बद्दल समजले. तेव्हा त्यांना जाब न विचारता, न रागावता प्रेमाने बोलून पुढच्या गोष्टी आम्ही ठरवल्या आणि मग कायदेशीर आणि विधिवत लग्न आम्ही लावून दिले, असे जानकी वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष आणि चालक बाबासाहेब पुजारी यांनी सांगितले.
Love Story : जोडीदाराचे डोळे जाणार हे माहिती असूनही ‘त्यांनी’ केलं लग्न! Video
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर एकत्र वृद्धाश्रमात आपल्या मरणाची वाट बघत एकटेपणात जगणाऱ्या वृद्धांमध्ये बाबुराव आणि अनुसया यांचा समावेश होत होता. मात्र, आता त्यांना मिळणारी प्रेमळ जोडीदाराची साथ असणार आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील शेवटचा टप्पा आता सुखकर होणार हे मात्र नक्की.