साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 20 फेब्रुवारी : एखाद्या व्यक्तीमध्ये कोणती कमतरता असली, तरी त्याला आयुष्यात जोडीदार हा लागतोच. एकमेकांच्या साथीनं त्यांना आयुष्यातील आनंद मिळवता येतो. दिव्यांग जोडपेही या पद्धतीनं यशस्वी आयुष्य जगत आहेत. या प्रकारचं एक उत्तम उदाहरण कोल्हापुरात पाहायला मिळतं. पती-पत्नी दोघंही संपूर्ण अंध असूनही त्यांचा चांगल्या पद्धतीनं संसार सुरू आहे. त्याचबरोबर ते इतरांच्या आयुष्यातही रंग भरण्याचं महत्त्वाचं काम करत आहेत. कशी झाली भेट? सतीश नवले हे मूळचे पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कासारी गावचे आहेत. पुण्यामध्ये शिक्षकी पेशाचे सर्व शिक्षण त्यांनी घेतले. हे सुरू असतानाच ते काही ठिकाणी शिकवण्यासाठी, एकपात्री प्रयोग करण्यासाठी जात होते. सीमा नवले या इस्लामपूर येथून पुण्यात शिक्षणासाठी आल्या होत्या. सतीश विद्यार्थ्यांशी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधण्यासाठी बऱ्याचदा कॉलेजच्या वर्गात जात असत. अशाच एका वर्गात त्यावेळी सीमा यांच्याशी सतीश यांची 2003 साली ओळख झाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सतीश यांनी आकाशवाणीपासून, येरळावाणी रेडिओ, ब्रेलवाणी रेडियो ॲप पर्यंतचा प्रवास पूर्ण केला. त्याचबरोबर त्यांनी विविध ठिकाणी काम देखील केले आहे. अंध जोडीदाराशी लग्न करण्यासाठी केली मोठी प्रतीक्षा, लव्हस्टोरी पाहून वाटेल अभिमान! Video 2003 ते 2014 या कालावधीमध्ये मैत्री ते प्रेम हा प्रवास सतीश आणि सीमा यांनी पूर्ण केला. प्रेमाची पुढची पायरी म्हणून त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं. त्यावेळी दोघंही अंध असल्यानं घरच्यांना अनेक प्रश्न पडले होते. त्यातच आमचा आंतरजातीय विवाह ठरणार होता. त्यामुळे सर्वांना समाजवणे देखील आवश्यक आहे. सर्व अडथळ्यांवर मात करत 2014 साली आम्ही लग्न केलं,’ अशी आठवण सीमा यांनी सांगितली. प्रेमात ज्याप्रमाणे एकमेकांची काळजी घेतली जाते, अगदी तशीच हे दोघेही एकमेकांसोबत समाजातील इतर अंध बांधवांची देखील काळजी घेतात. ‘प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ या संस्थेच्या माध्यमातून दोघांनी आजवर बऱ्याच अंध मित्र मैत्रिणींसाठी सामाजिक कार्य केले आहे. सध्या सीमा या कोल्हापुरातील एका बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत आहेत. तर सतीश यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या समावेशी शिक्षण संसाधन केंद्रात कार्यरत आहेत. या बरोबरच ते एका रेडिओसाठी देखील काम करतात. जोडीदाराचे डोळे जाणार हे माहिती असूनही ‘त्यांनी’ केलं लग्न! Video सामाजिक कामात आघाडीवर आम्ही आजवरची प्रत्येक दिवाळी ही भारताच्या वेगवेगळ्या सीमांवर जाऊन सैनिकांसोबतच साजरी केली आहे. शाळा, महाविद्यालय अशा बऱ्याच ठिकाणी अंधत्व जनजागृती व नेत्रदान अभियान देखील राबविले आहे. तर ब्रेल लिपीच्या प्रचार आणि प्रसारासाठीही प्रयत्न सुरुच असतात. याशिवाय अनेक अंध बांधवांना सोबत घेऊन सहल, भेटी असे अनेक उपक्रम राबविले आहेत. हे सगळं करत असताना सीमा यांचा नेहमी सक्रिय सहभाग राहील्याचे सतीश नवले यांनी सांगितले. या कार्याबाबत आजवर विविध ठिकाणी त्यांचा सत्कार आणि सन्मानही करण्यात आला आहे.
आम्ही जेव्हा लग्न करण्याचा विचार केला, तेव्हा बरेच प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होते. पण त्या सगळ्यांना सीमानं कृतीतून उत्तर दिले. ती अगदी सामान्य गृहिणी प्रमाणे व्यवस्थित घर सांभाळते. आम्हाला एक मुलगा देखील आहे. पुण्याहून कोल्हापूरमध्ये जेव्हा आम्ही राहायला आलो. तेव्हा अनेक पाहुणे आमच्या घरी यायचे. त्यामध्ये कोल्हापूरचे माझी जिल्हाधिकारी डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर आदी बरेच जण घरी जेवण करून गेले आहेत, असेही सतीश यांनी सांगितले. सध्या हे दोघेही आपल्यातील कमतरता विसरून एका सामान्य जोडप्याप्रमाणेच आपले आयुष्य ते घालवत आहेत. अंध बांधवांसाठीचे काम देखील त्यांनी आजवर सुरू ठेवल्यामुळे कित्येकांच्या आयुष्यात रंग भरण्याचे सुंदर काम त्यांच्याकडून होत आहे.