कोल्हापूर, 21 डिसेंबर : वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं तुम्ही सर्वांनीच अनेकदा रिक्षामधून प्रवास केला असेल. अपेक्षित स्थळी पोहचल्यानंतर आपण सर्वजण रिक्षा चालकाना पैसे देऊन निघून जातो. पण, रिक्षा चालकानं त्याचवेळी तुम्हाला काही भेटवस्तू दिली तर..? तुम्ही नक्कीच सुरुवातीला गोंधळून जाल आणि नंतर ती वस्तू पाहिल्यानंतर तुम्हाला त्या रिक्षाचालकाचं कौतुक वाटेल. रिक्षाचालकाकडून विशेष भेट मिळण्याचा अनुभव कोल्हापूरकरांना नेहमी येतो. ‘त्या’ घटनेनंतर घेतला निर्णय कोल्हापुरातील महेश शेवडे हे रिक्षाचालक हा अनोखा उपक्रम राबवतात. त्यांना पर्यावरणाची आवड आहे. त्यामुळे ते त्यांच्या रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक देशी रोप भेट देतात. रोज साधारण 10 ते 15 जणांना ते रोप देतात. 2005 साली कोल्हापूरमध्ये रस्त्याची विकासकामं सुरू होती. त्यावेळी अनेक मोठी झाडं तोडण्यात आली. झाडांची ही कत्तल त्यांना पाहवली नाही. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काही तरी करावे असं त्यांना वाटत होते. त्यामधून त्यांनी हा निर्णय घेतला. ‘2007 सालापासून मी प्रवाशांना रोप भेट देण्याचा उप्रक्रम राबवत आहे. तेव्हापासून आतापर्यंत 22 हजारांपेक्षा जास्त रोपांचं मी वाटप केलं आहे. काही रोपांची मी स्वत: लागवड केली आहे. माझ्या या उपक्रमाला निसर्गप्रेमी मंडळींकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. तुम्ही दिलेलं रोप आम्ही लावलं, अशी प्रतिक्रिया ते पुन्हा भेटल्यावर देतात,’ अशी माहिती महेश शेवडे यांनी दिली. Toilet Seva App : लक्ष्मी रोडवर आला एक वाईट अनुभव आणि तरुणानं सुरु केलं ॲप, Video कोणत्या रोपांचं करतात वाटप? आंबा, फणस, करंजी, बदाम, रामफळ, सीताफळ, जांभूळ, चिंच, उंबर, कडुलिंब, तुळस आदी ज्या झाडांची रोपे बीपासून तयार होतात अशा देशी रोपांचे मी प्रवाशांना वाटप करतो. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लावला जाईल आणि रोप लावणाऱ्याला देखील त्या झाडाचं फायदा होईल,’ असा माझा हेतू असल्याचं महेश यांनी स्पष्ट केलं. कशी तयार केली जातात रोपं ? ही रोपं तयार करण्यासाठी घरासमोर जी रिकामी जागा आहे, त्या ठिकाणी मी बिया रुजवतो. अंकुर फुटल्यानंतर साधारण एक ते दोन फुटाची रोपं तयार झाली, की ती रोपं देण्यासाठी तयार केली जातात. यामध्ये पिशवीला छिद्र पाडून, त्यात झाडपाला त्यावर माती आणि त्यानंतर त्यात रोप ठेवले जाते. तयार रोपं मी रिक्षात ठेवतो, असे देखील महेश यांनी सांगितले. नॉर्मल क्रिकेटपेक्षा अंधांच्या क्रिकेटमध्ये काय वेगळेपण असते? पाहा Video अनेक ठिकाणी सन्मान खरंतर आत्मिक समाधान म्हणून महेश शेवडे यांनी हा उपक्रम सुरू केला होता. त्यांच्या या कार्याची दखल अनेकांकडून घेण्यात आली आहे. या कार्याबद्दल त्यांना 2012 साली किर्लोस्कर कंपनीकडून वसंतराव गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसंच अनेक ठिकाणी मला सत्कारासाठी बोलावतात, असं महेश यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.