मुंबई, 27 नोव्हेंबर : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन शिवसेना (Shiv Sena) नेत्यांवर निशाणा साधला. जालन्याच्या साखर कारखान्यात भागीदार असलेले दहा शेतकरी (Farmers) आपल्याला भेटायला मुंबईत आले आहेत. त्यांनी आपल्याकडे शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या गैरव्यवहाराची तक्रार केलीय. त्यामुळे आपण 1 डिसेंबरला जालन्याला (Jalna) जाणार, अशी घोषणा किरीट सोमय्या यांनी केली. तसेच सोमय्या यांनी यावेळी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्यावरही निशाणा साधला.
‘भावना गवळी ईडीसमोर हजर व्हा’
“ईडीने भावना गवळी यांच्या केस संदर्भात जी चार्जशीट दाखल केलीय त्यात दोन आरोपी आहेत. दोघांच्या नावावर 69 कोटींची संपत्ती आहे. या दोघांपैकी एक आरोपी सईद खान हा जेलमध्ये आहे. तर दुसरा आरोपी भावना गवळी यांच्या आई आहेत. भावना गवळी यांच्या आईच्या नावाचा चार्जशीटमध्ये उल्लेख आहे. माझी भावना गवळी यांना विनंती आहे की, आपण केलेल्या शंभर कोटीच्या घोटाळ्याची शिक्षा आईला देऊ नका. ईडीसमोर हजर व्हा”, असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला. हेही वाचा : ‘महाराष्ट्रात मार्च-एप्रिल महिन्यात युतीचं पुन्हा सरकार येणार’, रामदास आठवलेंनी फॉर्म्युलाच सांगितला
सोमय्या यांचा अर्जुन खोतकरांवर नेमका आरोप काय?
“अर्जुन खोतकर यांनी साखर कारखान्यात घोटाळा तर केलाच पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने याच कारखान्याशी संबंधित 100 एकर शासकीय जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. खोतकरांना ही 100 एकर जागा बिल्डिंग, मॉल्स, कर्मिशिअल कॉम्पलेक्स करण्यासाठी हवी आहे. ही जमीन साखर कारखान्यासाठी देण्यात आली होती. त्या जागेची किंमत 400 कोटी आहे. शासकीय जमीन मिळून संपूर्ण जागा ही जवळपास 240 एकर आहे. त्याची एकूण किंमत 1 हजार कोटी इतकी आहे”, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. हेही वाचा : रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरण : अर्जुन खोतकरांची ED कडून 12 तास कसून चौकशी “आता ईडीने व्यवस्थित तपास सुरु केला आहे. मी आयकर विभागाला देखील याची तक्रार दिली आहे. जे बेनामी व्यवहार झाले आहेत त्याप्रकरणी मुळे परिवार, तापडीया परिवार आणि मुंबईचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी रुपाली नांगरे पाटील यांचं देखील नाव पुढे येत आहे”, असा दावा सोमय्या यांनी यावेळी केला.
‘शिवसेनेच्या आठ मोठ्या नेत्यांवर ईडीकडून कारवाई’
“ईडीने शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्यावर कारवाई केली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची 78 एकर जागा ईडीने जप्त केली आहे. शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 55 लाख परत केले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या प्रकरणी सध्या तपास सुरु आहे. दुसऱ्या दोन शिवसेना नेत्यांविरोधात मी तक्रारी केल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्याचाही तपास सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेतील आठ मोठे नेत्यांवर ईडीकडून कारवाई सुरु आहे”, असं किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.