दापोली, 26 मार्च : भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीत (Dapoli) दाखल झाले आहेत. दापोलीतील अनिल परब यांचे साई रिसॉर्ट तोडण्यासाठी दाखल झालेल्या किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या म्हणाले, मी जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा दापोलीकरांना आश्वासन दिलं होतं की माफिया अनिल परब **(Anil Parab)**ला सरळ केल्याशिवाय शांत बसणार नाही. अनिल परब असो नाही तर संजय कदम असो त्यांना सांगा तुमचे दिवस…., काय समजतात काय स्वत:ला. मिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला आणि अनिल परबांचा रिसॉर्ट तोडणार. उद्धव ठाकरेंना चॅलेंज देतो की… उद्धव ठाकरेंना चॅलेंज देतो, की उद्धव ठाकरे तुमच्यात हिंमत असेल तर अनिल परब यांचा रिसॉर्ट वाचवून दाखवा आणि मी तोडून दाखवतो. त्यांना काय वाटतं, माफिया सेना उभी केली. वसूलीचे पैसे येतात. सचिन वाझे पासून प्रदीप शर्मा सुपारीबाज… 4 राज्यांच्या निवडणुका झाल्यावर सांगितलं ना मोदी साहेबांनी की, महाराष्ट्रात जी अवस्था आहे त्या घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही असंही किरीट सोमय्या म्हणाले. वाचा : रिसॉर्ट तोडण्यासाठी ‘हातोडा’ घेऊन निघालेल्या किरीट सोमय्यांना अनिल परबांचे थेट आव्हान, म्हणाल… साई रिसॉर्ट तोडण्याचा आदेश कोणाचा आहे? कोर्टाचा आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल, पर्यावरण मंत्रालय, जिल्हाधिकारी, ठाकरे सरकारने पण लोकायुक्तमध्ये आदेश दिलाय की हा रिसॉर्ट बेकायदेशीर आहे. मोदी सरकारने अनिल परब विरोधात दापोली कोर्टात फौजदारी कारवाई सुरू करावी अशी याचिका दाखल केली आहे. इकडे पोलीस लिहून देतात की, रिसॉर्ट तुटलं तर बेरोजगारी वाढेल.. म्हणजे मोदी सरकारला चॅलेंज करत आहेत. अरे दम असेल ना तर आमच्याशी लढा, पोलिसांना कशाला मध्ये आणता असंही किरीट सोमय्या म्हणाले. वाचा : मंत्र्यांना अडचणीत कोण आणतं? नितीन गडकरी म्हणतात, “बायको किंवा मेहुणा नाहीतर चहापेक्षा किटली गरम…” ते 25 कोटी रुपये आले कुठून? एक लक्षात ठेवा फक्त रिसॉर्ट तोडणं आमचा उद्देश नाहीये. रिसॉर्टमध्ये 25 कोटी खर्च झाले ते कुठून आले. ते 25 कोटी रुपये वाझेच्या वसूलीचे आहेत की खरमाटेच्या ट्रान्सफरचे आहेत? हे पैसे आले कुठून याचा तपास झाला पाहिजे असंही किरीट सोमय्या म्हणाले. काय म्हणाले अनिल परब? राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, हा रिसॉर्ट माझा नाहीये. ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. किरीट सोमयया पालिकेचे नोकर आहेत का…? किरीट सोमयाय वातावरण खराब करत आहेत. जे रोजगार करणारे आहेत ते भयभीत झालेले आहेत. त्यांनी पोलिसांना तक्रार केली आहे. मी पुन्हा आता हायकोर्टात जाणार आहे कारण माझी प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत म्हणून मी पुढच्या आठवड्यात कोर्टात जाणार, किरीट सोमय्या तोडायला कर्मचारी आहेत का? हिंमत असेल तर तोडून दाखवा. अनिल परब यांनी पुढे म्हटलं, हिंमत असेल तर तोडून दाखवा. ते फक्त नौटंकी करत आहेत. हे रिसॉर्ट परवानगी घेऊन बांधले आहे. हे कोण ठरवणार रिसॉर्ट बेकायदेशीर आहे ते? जर कुठल्या कायद्याचा भांग झालेला आहे तर संबधित विभाग कारवाई करेल. माझे नाव मुद्दाम घेऊन वातावरण खराब करत आहेत. कोकणात ज्यांचे पाण्यात बंगले आहेत त्यांच्यावर पण कारवाई करावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.