कल्याण, 7 फेब्रुवारी : कल्याणमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कधीही न घडलेल्या घटना घडताना दिसत आहेत. कल्याण पूर्वेला नेतीवली चौकात लावण्यात आलेल्या काँग्रेसच्या एका बॅनरवर थेट शिवसेनेच्या मातब्बर दोन नगरसेवकांचे फोटो झळकले आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. या बॅनरवर शिवेसना नगरसेवक मल्लेश शेट्टी आणि नविन गवळी यांचे फोटो झळकले आहेत. बॅनरवर नेमकं आहे तरी काय? काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना पक्षाकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबादारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर नाना पटोले आज पहिल्यांदा कल्याणमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी येत आहेत. या कार्यक्रमानिमित्त त्यांचे कल्याण नगरीत स्वागत आहे, असा बॅनर काँग्रेसच्या वतीने लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी आणि नवीन गवळी यांचेही फोटो आहेत. हा बॅनर नेतीवली नाक्यावर लावण्यात आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीकांत शिंदेंचा वादग्रस्त बॅनर शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी गेल्या आठवड्यात नेतीवली नाक्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देणारा बॅनर लावला होता. मात्र, या बॅनरमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना टोमणे मारण्यात आले होते. ‘खासदार दिलदार है, मगर चमचो से लोग परेशान’, असा मजूकर या बॅनरमध्ये होता. या बॅनरमुळे कल्याणमधील शिवसेनेचे अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. ही बातमी प्रदर्शित केल्यानंतर संबंधित वादग्रस्त बॅनर हटवून दुसरा शुभेच्छांचा बॅनर त्याठिकाणी लावण्यात आला होता. हेही वाचा - काँग्रेस ताकद दाखवणार! मुंबईतील ऐतिहासिक मैदानात ‘या’ दिवशी नाना पटोले स्वीकारणार पदभार कल्याणच्या नेतीवली चौकात दोन्ही बॅनर लावण्यात आले आहेत. नेतीवली चौकात मल्लेश शेट्टी यांचं ऑफिस आहे. विशेष म्हणजे या नेतीवली नाक्यावर मुंबई, नाशिक आणि पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या हजारो गाड्यांची रोजची वर्दळ असते. त्यामुळे या बॅनरविषयी सर्वत्र जोरदार चर्चा रंगत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.