मुंबई, 7 फेब्रुवारी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) व नवनियुक्त कार्याध्यक्ष तसंच उपाध्यक्ष हे शुक्रवार (12 फेब्रुवारी) रोजी दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली आहे.
1942 साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून अंग्रेजो चलो जावो भारत छोडो हा नारा देत स्वातंत्र्यांच्या निर्णायक लढ्याची सुरुवात केली होती. त्याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आणि आमदार नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील, असं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत माजी प्रांताध्यक्ष, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवतील.
या कार्यक्रमाला राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व जेष्ठ नेते, राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा - OBC आणि मराठा आरक्षणावरून वादंग निर्माण झालं असतानाच शिवसेनेच्या माजी मंत्र्याचं मोठं वक्तव्य
नाना पटोले यांच्या बरोबरच 6 नवीन कार्याध्यक्ष तसंच उपाध्यक्ष हेदेखील मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यात पदभार स्वीकारतील. पदभार स्वीकारताच नाना पटोले हे कृषी कायदे आणि इतर मुद्द्यांवरून मोदी सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.
राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पदभार स्वीकारल्यानंतर कार्याध्यक्ष त्यांच्या भागात दौरे करणार आहेत. तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने 'न्यूज18 लोकमत'सोबत बोलताना दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Nana Patole