मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बैलगाडा शर्यतीचं इतकं खूळ का आहे? या शर्यतीची सुरुवात ते वाद, सर्वकाही...

बैलगाडा शर्यतीचं इतकं खूळ का आहे? या शर्यतीची सुरुवात ते वाद, सर्वकाही...

बैलगाडा शर्यत

बैलगाडा शर्यत

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Vaishnavi Raut

मुंबई, 1 डिसेंबर :  गौतमी पाटील ज्यामुळे फेमस झाली ते गाणं तुम्हाला आठवतच असेल - 'नाद एकच, बैलगाडा शर्यत'... सोशल मीडियावर स्क्रोल करताना अनेकदा बैलगाडा शर्यतीचे फुल्ल रांगडे स्टाईल मधील रिल्स तुम्ही रोजच बघत असाल. दिसणारंही का नाही... सध्या महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचं फॅडच आलंय. पण याच बैलगाडा शर्यतीचा वाद कोर्टात सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीशी संबंधित कायद्याला आव्हान देण्यात आलं आहे. पण राज्यातील सगळ्या बैलगाडा मालकांनी शर्यतीचा आग्रह धरून ठेवलाय. म्हणून नक्की ही बैलगाडा शर्यत असते का? तिची सुरुवात कशी झाली? कुठून झाली? कशी असते ही शर्यत?

भारताला कृषिप्रधान देश म्हटलं जातं. शेतकऱ्याचं त्याच्या पशूंशी वेगळं नातं पुरातन काळापासूनच आहे. शेतकऱ्याने बैलाचं संगोपन सुरु केलं तसंच आपल्या मनोरंजनासाठी देखील याचा वापर सुरु केला. त्यातूनच निर्माण झालेला खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत. शर्यतीच्या या प्रकाराला जवळपास ४०० वर्षाची जुनी परंपरा असल्याचं जाणकार सांगतात. विशेषतः शेतातील हंगाम संपल्यानंतर ग्रामदैवत असलेल्या ठिकाणी जत्रा, उरूस भरवून याचं आयोजन केलं जातं. महाराष्ट्रात काही ठिकाणी बैलगाडा शर्यतीला छकडा किंवा शंकरपट असं सुद्धा म्हणतात.

Viral Video Bull Attack : 'आ बैल मुझे मार'! बैलासोबत फोटो काढणाऱ्या तरुणाची झाली फजिती, Video पाहून हसू आवरणार नाही

खिल्लार जातीच्या बैलांना या शर्यतीसाठी विशेष मान असतो. पुणे आणि अहमदनगर भागात वेग आणि अंतर कापण्याच्या कालावधीवर ही शर्यत बेतलेली असते. हा शर्यतीचा असा एकमेव प्रकार आहे की ज्यामध्ये शर्यती दरम्यान बैलांना सोडून दिलं जातं, बैलांची गाडी चालवणारा कोणीही चालक त्यांच्या सोबत नसतो. म्हणजे बैल ही शर्यत स्वतः त्यांच्या ताकतीनुसार जिंकतात. या शर्यतीमध्ये सर्वात पुढे घोडी पळते. या घोडीवर माणूस बसलेला असतो. घोडी चालकाचं काम हे बैलांना योग्य दिशा आणि नेतृत्व करण्याचं असतं. त्यानंतर बैलगाड्याला जुंपलेली २ बैल असतात त्यांना 'जोकाट' असं संबोधलं जातं.

बैलांना पळण्यासाठी एक ठरावीक प्रकारचा मऊ मातीचा घाट बनवलेला असतो. ज्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे असतात आणि कठड्यांच्या बाजूला लोकांना बसण्याची व्यवस्था असते. घाटामध्ये अंतिम सीमारेषेजवळ झेंडा घेऊन एक माणूस उभा असतो जो शर्यतीचे सेकंद मोजतो. जर घाट सपाट असेल तर ४५० फूट अंतर आणि जर घाटात चढ असेल तर ४३० फूट असं अंतर हे या बैलगाडा शर्यतीसाठी असतं. जिंकणाऱ्या बैलगाड्याला 'घाटाचा राजा' असा किताब दिला जातो.

तर पश्चिम महाराष्ट्रात याला छकडी शर्यत म्हणतात आणि माळरानात मोकळ्या मैदानावर ही स्पर्धा घेतली जाते. या खेळामध्ये एकाच वेळेस ५/७/९ अशा गाड्या सोडल्या जातात आणि जवळपास १२०० फूटाचं अंतर त्यांना पार करावं लागतं. छकडी गाडीमध्ये एक माणूस बसलेला असतो, जो बैलाचा चालक असतो. जी छकडी गाडी सर्वात पहिल्यांदा हे अंतर पार करेल, त्या बैलांना पहिला क्रमांक दिला जातो. या बैलजोडीने ओढल्या जाणाऱ्या छकडी गाडीचं वजन अंदाजे ७० ते ८० किलो असतं. प्रत्येक गाडीसाठी मातीचे ८ ते १० वेगवेगळे ट्रॅक बनवलेले असतात.

विदर्भात याला शंकरपट म्हणतात. इथे काही भागात एका वेळेस एक गाडी किंवा काही भागात २ बैलगाड्या सहभागी असतात. गाडी चालवायला चालक असतो आणि या बैलजोडीला सर्वात कमी वेळेत ४५० फूट अंतर पार करायचं असतं. अशा प्रकारे प्रत्येक भागात जिंकणाऱ्या बैलगाडा मालकांना लाखोंनी बक्षिसं मिळतात आणि मानसन्मान मिळतो. गावातील अशा स्पर्धेत भाग घेणाऱ्या बैलांच्या संख्येवरून त्या गावाची श्रीमंती मोजतात. आपल्या गावाच्या बैलांना प्रोत्साहन द्यायला जेव्हा अक्खं गाव जमतं तेव्हा एकोपा वाढतो. बैलगाडा शर्यतीचा गावाच्या अर्थकारणात देखील वाटा आहे. शर्यतीच्या आयोजनाच्या निमित्ताने छोटेखानी व्यवसाय चालविणाऱ्यांचा उदरनिर्वाह होत असतो.

अशा या बैलगाडा शर्यतीवर 2011 मध्ये बंदी आणली गेली होती. कारण बैल या प्राण्याचा संरक्षण प्राण्यांच्या या यादीत समावेश झाला. त्यानंतर 2012 मध्ये बैलगाडा चालक-मालक संघटनेने उच्च न्यायालयात बंदी हटविण्यासाठी याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली तेव्हा बैलगाडा चालक-मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर काही अटी-शर्तींवर बंदी उठवली गेली मात्र नंतर बैलांचा छळ होत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणलं गेलं आणि पुन्हा बंदी लागली. जवळपास ७ वर्ष हा बंदी घालण्याच्या आणि उठवण्याच्या खेळीनंतर 2021 मध्ये राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली होती मात्र आता पुन्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापुढे आहे.

First published:

Tags: Bull attack, Gautami Patil, Maharashtra News, Video viral