नागपूर, 29 ऑगस्ट: पूर्व विदर्भात मुसळधार पावसानं हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शहरांना जोडणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मध्य प्रदेशात 12 तासांत 400 हून जास्त मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. या भागातील नदी-नाल्यांना पूर आल्यानं पूराचं पाणी अनेक गावांमध्ये शिरलं आहे. नदी काठावरील गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हेही वाचा... Unlock 4.0 : शिक्षकांसाठी आणि नववीच्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी उघडणार शाळा
रामटेकमध्ये यंदा पहिल्यांदा तोतला व नवेगांव खैरी धरणाचे दरवाजे 5.5 मिटरने उघडण्यात आले आहेत. तोतला धरणाचे 14 तर नवेगांव खैरीचे 16 दरवाजे 40 वर्षांत पहिल्यांदा उघडण्यात आले आहेत. पेंच नदी आणि कन्हान नदीला पूर आला आहे. दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रामटेक, नागपूरहून पारशिवनी, सावनेर जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
रामटेक तालुक्यात शनिवारी सकाळी 108 मिलीमीटर पाऊस झाला. शहरातील शिव नगरात असलेल्या नाल्याला पूर आला असून गावात पाणी शिरलं आहे. रस्त्यावर दोन फूटापर्यंत पाणी साचलं आहे. नगरधनहून काचुरवाही, नंदापुरीहून लोहडोंगरी जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुचला आहे.
दुसरीकडे मधप्रदेशातील चौरई धरण क्षेत्रात 12 तासांत 434 मिलीमीटर पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे चौरई धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
2005 नंतर पहिल्यांदा 2020 मध्ये उघडले दरवाजे...
दुसरीकडे, गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण 33 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 2005 नंतर पहिल्यांदा 2020 मध्ये उघडण्यात आले आहेत. 7 दरवाजे 4 मीटरने तर 26 दरवाजे साडेतीन मीटरने उघडण्यात आली आहेत. 23 हजार 383 क्युमेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू आहेत.
गोसेखुर्द धरणामधून वेळोवेळी सोडण्यात येणारे अधिकच्या विसर्गामुळे तसेच पुढे आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वैनगंगा नदीकिनारी गावांमध्ये विशेष दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
वैनगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे उपनद्या व नाल्यांमध्ये बॅकवाटरमुळे अंतर्गत व मुख्य रस्ते बंद होण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यक ठिकाणी बॅरेकेडींग पोलीस विभागाकडून लावण्याचे कार्य सुरू आहे.
हेही वाचा...लॉकडाऊनमध्ये लागली लॉटरी! तब्बल 28 वर्षांनी मिळालं चोरी गेलेलं मंगळसूत्र
गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व गोदावरी नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेता सर्व तहसिलदार व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नदीकिनारी भागात वेळोवेळी अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून दवंडी द्यावी तसेच प्राप्त परिस्थितीचा विचार करुन विविध विभागांच्या समन्वयातून आवश्यकता पडल्यास तात्काळ सदर परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. वैनगंगा व उपनद्यांच्या नदीकिनारी गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain