जळगाव, 4 डिसेंबर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणामध्ये झाला होता, असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यानंतर तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून, विरोधकच नाही तर सत्तेत असलेल्या शिंदे गटाकडून देखील भाजप आणि प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, मंत्रिपद गेलं खड्ड्यात असं प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं गुलाबराव पाटील यांनी
गुलाबराव पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवरायांच्याबाबतील कोणीही बोलण्याची गरज नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असो. ज्यांना शिवराय माहीत आहेत त्यांनीच बोलावं. शिवरायांबद्दल बोलताना आता आचारसंहिता करण्याची गरज आहे. कारण सध्या कोणीही येतो आणि शिवरायांबद्दल बोलतो. मंत्रिपद गेलं खड्ड्यात त्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
हेही वाचा : यांची लायकी आहे का? संजय राऊत प्रसाद लाड यांच्यावर भडकले
भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य सुरूच
भाजप नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर भाजप नेते, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यानंतर सर्वच थरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Eknath Shinde, Gulabrao patil