नितीन नांदुरकर, जळगाव 05 नोव्हेंबर : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आणि अपक्ष आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. मात्र, या मोठ्या बंडानंतर राज्यात दररोज राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू झाल्या. यादरम्यानच आता गुलाबराव पाटील यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, की राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले आहेत. आता फक्त त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरायचा बाकी आहे. राष्ट्रवादीने याआधीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो तशी ती वेळ होती. आताही शिंदे गटाने हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती, असा खळबळजनक गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद पेटला, नाना पटोलेंनी चंद्रकांत खैरेंना सुनावलं, म्हणाले...
शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली असती, असा गौप्यस्फोट करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू असून ते संपताच राज्यातील सरकार कोसळेल असा दावा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले, की अधिवेशन संपलं आहे. मात्र, सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा तसंच आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारची विधाने केली जात असल्याचा आरोपही गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.
Shahajibapu Patil : शहाजीबापू नॉट ओके, 15 दिवसांपूर्वी उद्घाटन केलेल्या रस्त्याची मनसेकडून पोलखोल
काँग्रेसचे आमदार फुटणार?
दुसरीकडे, काँग्रेसचे 22 आमदार फुटणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तशी तयारी केली आहे, असा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. कोर्टाने निर्णय दिला तर शिंदे गटाचे 16 आमदार बाद ठरले जातील. त्यामुळे हे सरकार कोसळणार आहे. त्यामुळे आपले मुख्यमंत्रिपद कायम राहावे यासाठी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहे. देवेंद्र फडणवीस हुशार माणूस आहे. काँग्रेसची सध्या रॅली सुरू आहे. त्यामुळे सगळे शांत बसलेले आहे, असा दावाच चंद्रकांत खैरे यांनी केला आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gulabrao patil, NCP